मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:36 IST2025-05-16T11:13:35+5:302025-05-16T11:36:13+5:30
बुधवारी मेट्रोच्या तांत्रिक चाचणी साठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सदर बाब एमएमआरडीए अधिकाऱ्यांसह काहींनी निदर्शनास आणून दिली.

मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड- मीरा भाईंदर शहराच्या मुख्य सार्वजनिक रस्त्यावर काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुमारे २ वर्षां पासून भाजपा आमदार मेहतांच्या कंपनीने जागेच्या मोबदल्यावरून बंद पडले होते. बुधवारी मेट्रोच्या तांत्रिक चाचणी साठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सदर बाब एमएमआरडीए अधिकाऱ्यांसह काहींनी निदर्शनास आणून दिली. त्यावरून फडणवीस यांनी तात्काळ मेहतांना मेट्रोचे काम बंद केल्यावरून कान टोचत प्रशासनाला काम करू देण्यास सांगितले. त्या नंतर मेट्रो जिन्याचे काम तात्काळ सुरु झाले आहे.
दहिसर - काशिगाव हा मेट्रोचा पहिला टप्पा आधी सुरु होणार आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज मार्ग वरील प्लेझंट पार्क - विनय नगर या ठिकाणी बांधल्या जाणाऱ्या काशिगाव मेट्रो स्थानकाचे एका बाजूचे जिन्याचे काम हे भाजपा आ. नरेंद्र मेहतांच्या कंपनीने जागेचा मोबदला हवा म्हणून थांबवले होते. त्या बाबत वर्षभरा पूर्वी देखील मेहतांवर मेट्रोचे काम थांबवल्या बद्दल आरोप झाले.
नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील सेव्हन इलेव्हन कंपनी मुळे काशिगाव मेट्रो स्टेशनचे काम रखडून मेट्रो सुरु होण्यास विलंब झाल्याची टीका केली होती. त्यावर मेहतांनी पत्रकार परिषद घेऊन, आपण तर पालिकेला पत्र दिली असून जागा ताब्यात घ्या व शासन धोरण नुसार मोबदला द्या. २९ कोटी मोबदला चेणे येथील जागेसाठी पालिकेने दिला असे सरनाईकां कडे इशारा करत म्हटले. मग शासन धोरणा नुसार आम्हाला पण जागेचा मोबदला रक्कम स्वरूपात द्यावा हे सतत पत्र देऊन सुद्धा पालिकेने जागा घेतली नाही असे आ. मेहतांनी सांगितले होते.
मेट्रो स्थानकाचा जिना जिकडे बांधायचा आहे तो मुळात पालिकेने ४५ मीटर विकास आराखड्यातील विकसित केलेला सार्वजनिक वापरातील रस्ता आहे. त्या लगत पालिकेचा नाला आहे. मात्र काही वर्षा पूर्वी जागा विकत घेऊन मेहतांनी वापरातील जुन्या रस्ता व नाला वर मेट्रोचे काम रोखून धरणे निंदनीय आणि विकास काम रोखण्याचा आडमुठेपणा आहे असे आरोप देखील केले गेले.
भाईंदर पश्चिम, मॅक्सस पुढील तोदिवाडी येथे २०२० साली देखील डीपी रोड व मेट्रोचे काम मेहतांच्या कंपनीने बंद पाडल्याचे तोंडी व लेखी आरोप झाले होते. त्यावेळी जमीन धारक श्यामसुंदर अग्रवाल यांनी पालिकेस पत्र देऊन सदर जागेचा मेहतांच्या कंपनीशी संबंध नसून मेट्रो आणि रस्त्याचे काम करावे म्हणून लेखी परवानगी पालिकेला दिली होती. त्या नंतर पालिकेने मेट्रोचे काम केले. तेव्हा सुद्धा प्रताप सरनाईक यांनी पालिकेस पत्र देऊन मेट्रोचे काम बंद पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.
दरम्यान बुधवारी काशिगाव - दहिसर मेट्रोच्या तांत्रिक चाचणी साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आदी आले होते. तेव्हा मेट्रो स्टेशनच्या जिन्याचे काम मेहतांनी बंद पाडल्याची तक्रार मुख्यमंत्री यांच्या कानावर गेली. मुख्यमंत्री यांनी तात्काळ मेहतांची कानउघाडणी करत काम तात्काळ सुरु करण्यास सांगितले. त्या नंतर गेल्या दोन वर्षां पासून बंद पाडलेले मेट्रो जिन्याच्या कामास तात्काळ सुरवात करण्यात आली.
मुख्यमंत्री आमचे प्रमुख आहेत. ते म्हणाले कि तुम्ही जागा आताच देऊन टाका. आयुक्तांना बोलावून तुमचा प्रश्न सोडवण्याची माझी जबाबदारी असे त्यांनी सांगितले. गेल्या ३ वर्षां पासून मी सतत सर्वांना पत्र देऊन मागणी करतोय. पण कोणीच त्यावर निर्णय घेत नाही. आता मुख्यमंत्री मध्ये पडल्याने निदान मला न्याय मिळेल.
- नरेंद्र मेहता, भाजपा आमदार, मीरा भाईंदर.