'आम्ही आयकर अधिकारी.. घरातील सर्व मालमत्ता दाखवा'; मुंबईचे भामटे फसवण्यासाठी आले, अन् स्वतःच गजाआड गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:28 IST2026-03-05T15:21:37+5:302026-03-05T15:28:07+5:30
Wardha : मुंबईचे दोन भामटे आयकर अधिकारी बनून रामनगरमधील श्रीनिवास कॉलनीतील एका घरी धडकले. त्यांनी सर्च वॉरंट दाखवून घर झडतीही सुरू केली. मात्र, त्यांचा संशय आल्याने विचारपूस करताच ते बनावट आढळून आले.

'We are Income Tax officers.. show all the assets in the house'; Mumbai's bhamte came to cheat, and then went away on their own
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुंबईचे दोन भामटे आयकर अधिकारी बनून रामनगरमधील श्रीनिवास कॉलनीतील एका घरी धडकले. त्यांनी सर्च वॉरंट दाखवून घर झडतीही सुरू केली. मात्र, त्यांचा संशय आल्याने विचारपूस करताच ते बनावट आढळून आले. काँग्रेसचे शेखर शेंडे आणि प्रवीण हिवरे यांच्या समयसूचकतेने ते पोलिसांच्या गजाआड गेले.
हे दोन भामटे बुधवारी दुपारी २ च्या सुमारास श्रीनिवास कॉलनीतील सेवानिवृत्त प्रा. चिंतामण कोंगरे यांच्या निवासस्थानी धडकले. त्यांनी आपली नावे किशन ज्ञानेश्वर पर्वत व चेतन रुपेश चौहान, अशी सांगितली. या दोघांनी आयकर विभागात कार्यरत असल्याचे सांगून ओळखपत्रही दाखविले. सर्च वॉरंट दाखवून आम्हाला घराचा सर्च करायचा असल्याचे प्रा. कोंगरे यांना सांगितले. घरातील सर्व कागदपत्र, रोख रक्कम दाखवा, असा दम त्यांनी भरला. दोघांनीही घर व कागदपत्रांचे व्हिडीओ शूटींग घेण्यास सुरुवातही केली. त्यांनी एकेक कागदपत्र मागून प्रा. कोंगरे यांना जेरीस आणले. मात्र, संशय आल्याने प्रा. चिंतामण कोंगरे यांचे चिरंजीव प्रा. सुहास कोंगरे यांनी काँग्रेसचे शेखर शेंडे आणि प्रवीण हिवरे यांना भ्रमणध्वनी केला. हिवरे यांनी त्या भामट्यांना सीएला बोलवितो, असे सांगण्यास सांगितले. त्यांना तसे सांगितले असता भामट्यांनी आम्हीच तुमच्या सीएकडे येतो, असे सांगितले.
अखेर पोलिसांना केले पाचारण
दोन्ही भामटे बनावट आयकर अधिकारी असल्याचा संशय बळावल्याने त्यांची शहानिशा करण्यासाठी अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर आणि नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ठाणेदार अजय भुसारी यांनी सांगितले.
उडवाउडवीची उत्तरे दिली, संशय बळावला
नंतर सदर आयकर अधिकारी किशन पर्वत आणि चेतन चौहान प्रा. कोंगरे यांच्यासह सीए जगदीश चांडक यांच्याकडे पोहोचले. तेथे शेखर शेंडे आणि प्रवीण हिवरे पोहोचले. त्यांनी भामट्यांची कसून विचारपूस केली. भामट्यांजवळ असलेल्या भारत सरकारच्या आयकर विभागाच्या ओळखपत्रांबाबत संशय आला. त्यांच्या नियुक्ती पत्राबाबतही संशय बळावला. त्यामुळे अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भामट्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.