पोलीस कस्टडीत असताना 'एफ फाॅर्म'वर स्वाक्षऱ्या; डॉ. रेखा कदम संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 12:59 PM2022-04-13T12:59:34+5:302022-04-13T13:12:35+5:30

कदमांच्या गैरप्रकाराची सारवासारव करणारा कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Wardha illegal abortion : Dr. Rekha Kadam signature on F Form while in police custody | पोलीस कस्टडीत असताना 'एफ फाॅर्म'वर स्वाक्षऱ्या; डॉ. रेखा कदम संशयाच्या भोवऱ्यात

पोलीस कस्टडीत असताना 'एफ फाॅर्म'वर स्वाक्षऱ्या; डॉ. रेखा कदम संशयाच्या भोवऱ्यात

Next
ठळक मुद्दे१० जानेवारीला भरले ऑनलाइन फॉर्म : अभ्यासगट समितीच्या पाहणीत उलगडले वास्तव

महेश सायखेडे

वर्धा : अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटमधील मनमर्जी कारभारावरील पडदाच सध्या 'लोकमत' वृत्तमालिकेच्या माध्यमातून उघडत चालला आहे. 'डी अँड सी' (गर्भाशय क्युरेटिंग) बाबतच्या ४४ नोंदींची माहिती एका साध्या कागदावर आढळल्याचे पुढे आल्यानंतर ज्यादिवशी डॉ. रेखा कदम यांना अटक करण्यात आली, त्याच दिवशी सोनोग्राफीशी संबंधित असलेल्या तब्बल ७३ 'एफ फाॅर्म'वर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्याची धक्कादायक माहिती सहा सदस्यीय अभ्यासगट समितीच्या पाहणीत पुढे आल्याचे माहिती अधिकारांतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनंतर उजेडात आली आहे. त्यामुळे कदमांच्या गैरप्रकाराची सारवासारव करणारा कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अभ्यासगट समितीच्या पाहणीत कदम हॉस्पिटल येथे २ जानेवारी २०२२ ते ८ जानेवारी २०२२ दरम्यान एकूण ७३ 'एफ फाॅर्म' आढळले. आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांनी आणखी बारकाईने पाहणी केली असता सदर 'एफ फाॅर्म'सोबत उपजिल्हा रुग्णालय, आर्वी येथून संदर्भित केलेल्या १५ सोनोग्राफी संदर्भ चिठ्ठ्यांवर सोनोग्राफी करण्याचे कारण आढळून आले, तर ५८ संदर्भ चिठ्ठ्यांवर सोनोग्राफीसाठीचे कुठलेही कारण नमूद केल्याचे आढळले नाही. इतकेच नव्हे, तर सर्व ७३ 'एफ फाॅर्म' १० जानेवारी २०२२ रोजी ऑनलाइन भरल्याचे आढळले. शिवाय त्यावर १० जानेवारी २०२२ रोजी डॉ. रेखा कदम यांनी स्वाक्षरी केल्याचे पुढे आले. जेव्हा की तेथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. रेखा कदम यांना १० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अटक केल्याचे अभ्यास गट समितीतील तज्ज्ञांना सांगण्यात आले. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार सध्या संशोधनाचाच विषय ठरत आहे.

डिक्लेरेशनवर गरोदर महिलांची स्वाक्षरीच नाही

अभ्यासगट समितीतील तज्ज्ञांनी ७३ 'एफ फाॅर्म'ची बारकाईने पाहणी केली असता काही फॉर्म वगळता गरोदर स्त्रियांची डिक्लरेशनवर स्वाक्षरी आढळून आली नाही. त्यापैकी काही स्त्रियांशी अभ्यासगट समितीतील तज्ज्ञांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांची सोनोग्राफी कधी झाली व इतर माहिती विचारली असता ती 'एफ फाॅर्म'मधील माहितीशी जुळत असल्याचे आढळून आले.

नोंदणी प्रमाणपत्र एक, पण सोनोग्राफी मशीन दोन

कदम नर्सिंग होम येथील सोनोग्राफी केंद्राच्या नोंदणी प्रमाणपत्रावर दोन सोनोग्राफी मशीनची नोंदणी अभ्यासगट समितीच्या पाहणीत आढळली आहे.

डॉ. कुमार कदमच्या कक्षात आढळला पेंटाझोसीन इंजेक्शनचा साठा

सर्जरी पेन कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेंटाझोसीन या इंजेक्शनचे सात ते आठ बॉक्स डॉ. कुमार कदम यांच्या कक्षात समितीच्या पाहणीत आढळून आले. विशेष म्हणजे हे इंजेक्शन औषधांच्या दुकानातून सर्वसामान्यांना सहज मिळत नाही.

Web Title: Wardha illegal abortion : Dr. Rekha Kadam signature on F Form while in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.