पुनर्भरणाला जोरदार पावसाची प्रतीक्षा

By Admin | Updated: June 18, 2016 01:23 IST2016-06-18T01:23:07+5:302016-06-18T01:23:07+5:30

राज्यात उद्भवलेली पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता सर्वत्र पुनर्भरण यंत्रणेवर भर देण्याच्या बाबी समोर येऊ लागल्या होत्या.

Waiting for strong rain again | पुनर्भरणाला जोरदार पावसाची प्रतीक्षा

पुनर्भरणाला जोरदार पावसाची प्रतीक्षा

वर्धा : राज्यात उद्भवलेली पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता सर्वत्र पुनर्भरण यंत्रणेवर भर देण्याच्या बाबी समोर येऊ लागल्या होत्या. पण कुणी पुढाकार घेताना दिसत नव्हते़ वर्धेत मात्र आपला वैद्यकीय व्यवसाय हा समाजहिताकरिता काही काळ बाजूला सारून डॉक्टरांनी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णयच घेतला नाही तर लोक सहभागातून कामालाही सुरुवात केली. हे काम आता पूर्णत्वास आले असून पुनर्भरणाकरिता आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे़
वैद्यकीय जनजागृती मंचने हनुमान टेकडी, पिपरी मेघे येथे पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याची संकल्पना राबवली़ टेकडीच्या सभोवताल खंदक करण्यात आले आहे़ प्रथम केवळ वैद्यकीय जनजागृती मंचच्या सदस्यांनी सुरु केलेल्या कार्याला लोकसहभाग लाभला़ तब्बल दोन ते अडीच महिने डॉक्टर आणि नागरिकांनी हातात पावडे घेऊन खंदक तयार केले़ झाडांसाठी खड्डेही यावेळी खोदण्यात आले.
खंदक खोदण्याचे काम आटोपले असून आता फेन्सिंगसाठी लोकसभागातून निधी उभारला जाणार आहे़ पावसाचे आगमन होताच वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे़ वैद्यकीय जनजागृती मंचच्या पुढाकाराने वर्धेत एका टेकडीवर जल पुनर्भरणाचा प्रयोग राबविण्यात आला़ पाणीटंचाई निवारणार्थ लोकसहभागातून असेच प्रयोग जिल्ह्यात अन्यत्र राबविले जाणेही गरजेचे आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)

जल पुनर्भरणाचे वैयक्तिक प्रकल्पही गरजेचे
वैद्यकीय जनजागृती मंचने सामूहिक जल पुनर्भरणाचा प्रयोग राबविला़ या मंचातील डॉक्टरांनी वैयक्तिक जल पुनर्भरणाचे संयंत्रही नागरिकांना उपलब्ध करून दिले आहेत़ शिवाय अनेक डक्टरांनी ते आपापल्या घरी बसविले आहेत़ यासाठी अधिक खर्च येत नसल्याने नागरिकांनी सदर संयंत्र आपापल्या घरी लावावे, असे आवाहन केले जात आहे. जल पुनर्भरणाची गरज ओळखून नागरिकांनी वैयक्तिक प्रकल्प राबविले तर जिल्ह्यात कधीही पाणी टंचाई जाणवणार नाही़ यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घेत पुनर्भरण करणे गरजेचे आहे़ यासाठी लागणारे संयंत्र डॉ. सचिन पावडे यांच्यासह व्हीजेएमच्या सदस्यांकडे उपलब्ध आहे़

Web Title: Waiting for strong rain again