अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त, ४.१० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 18:29 IST2021-12-21T18:28:13+5:302021-12-21T18:29:39+5:30
गावकऱ्यांनी लाल रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडून ठेवला होता. तसेच ट्रॅक्टरमध्ये १०० फूट वाळू भरून होती. चालकास विचारणा केली असता वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना त्याच्याजवळ नसल्याचे दिसून आले.

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त, ४.१० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
वर्धा : अवैधरीत्या वाळूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांवर कारवाई करीत वाळूसाठा भरलेले तीन ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई वडनेर पोलिसांकडून करण्यात आली.
बोपापूर येथील नागरिकांनी वाळू घाट परिसरात वाळू भरलेला ट्रॅक्टर पकडून ठेवल्याची माहिती वडनेर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोपापूर परिसरात गेले असता गावातील योगेश दौलतकर, पंडित बुटे, पवन दौलतकर, आशिष पायेकार आदींसह गावकऱ्यांनी लाल रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडून ठेवला होता. तसेच ट्रॅक्टरमध्ये १०० फूट वाळू भरून होती. चालक उमेश रामदास सोयाम, रा. पोहणा याला विचारणा केली असता वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना त्याच्याजवळ नसल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून १०० फूट वाळू व ट्रॅक्टर, तसेच एक ट्रॉली, असा एकूण २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच धोच्ची येथून येरला गावाकडे वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी डोरला चौरस्त्यावर नाकाबंदी केली असता धोच्चीकडून ट्रॅक्टर (क्र. एम.एच. ३२ ए.एच.७४७२) भरधाव येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये वाळू दिसून आली. चालक रूपेश विठ्ठल भडके याच्याजवळ कुठलाही वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. चालकाच्या ताब्यातून वाळू आणि ट्रॅक्टरसह ट्रॉली असा एकूण २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे, अजय वानखेडे, प्रवीण बोधाने, अमोल खाडे, प्रफुल्ल चंदनखेडे यांनी केली.