पहिल्या नोकरीचा पहिला दिवस उजाडण्याआधीच काळाचा घाला; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 07:57 IST2023-07-02T07:53:13+5:302023-07-02T07:57:20+5:30
बारावीपर्यंत वर्धेत शिक्षण घेणाऱ्या कृष्णनगर येथील तेजस छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचे धडे घेत होता.

पहिल्या नोकरीचा पहिला दिवस उजाडण्याआधीच काळाचा घाला; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
वर्धा : कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झाल्याने वर्धेहून नोकरीसाठी पुण्याकडे निघालेल्या तेजस रामदास पोफळे या तरुणावर काळाने घाला घातला. नोकरीचा पहिला दिवस उजाडण्याआधीच मृत्यूने त्याला गाठले. बुलढाण्याजवळ झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.
बारावीपर्यंत वर्धेत शिक्षण घेणाऱ्या कृष्णनगर येथील तेजस छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचे धडे घेत होता. अखेरच्या वर्षात असताना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये बड्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नोकरीसाठी त्याचे सिलेक्शन केले. ही वार्ता कुटुंबीयांना दिल्यावर तेजस वर्धेला परतला. शुक्रवारी पुणे येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्सने तो रवाना झाला. बुलढाणा जिल्ह्यात ट्रॅव्हल्सच्या अपघातात तेजसचा मृत्यू झाला.
पोफळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
तेजसच्या अपघाती मृत्यूमुळे पोफळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. तेजसचे वडील रामदास पोफळे हे सुतारकाम करून कुटुंबाचा गाढा हाकतात. आई सविता या गृहिणी आहेत. तर तेजसची बहीण श्रावणी ही पिपरी (मेघे) येथील महाविद्यालयात इंजिनीअरिंगचे धडे घेत आहे.
प्राध्यापक पित्यासह माय-लेकीचा मृत्यू
निरगुडसर (पुणे) : समृद्धीवरील या अपघातात निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. प्राध्यापक कैलास गंगावणे (वय ४८) त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय ३८) व मुलगी सई गंगावणे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. मूळचे शिरूरचे हे कुटुंब नोकरीनिमित्त निरगुडसरला होते. कैलास गंगावणे हे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात २७ वर्षे प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला तेथे सोडून हे कुटुंबीय पुण्याला निघाले होते.
मृत्यूच्या दारातून परतलो...
केवळ नशीब बलवत्तर, म्हणून मी वाचू शकलो, अशी भावनिक प्रतिक्रिया या अपघातातील बचावलेल्या आयुष गाडगे या प्रवाशाने दिली. आयुष गाडगे हा युवक नागपूरच्या बुटी बोरी येथून विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसला होता. छत्रपती संभाजीनगरला त्याला जायचे होते. प्रवासादरम्यान, आयुषला गाढ झोप लागली होती. अपघात घडला तेव्हा त्याच्या अंगावर दोन ते तीन प्रवासी पडले आणि त्याला जाग आली. त्यावेळी बसमध्ये आग आणि आरडाओरडच सुरू होती. अशातच आयुषला एक खिडकी दिसत होती. त्याने क्षणाचाही विलंब न लावता, त्या खिडकीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. आयुषसोबत आणखी साईनाथ रणसिंग पवार व योगेश रामदास गवई हे दोघेही एकमेकांचे हात धरून बाहेर आले. तिघेही खिडकीतून कसेबसे बाहेर पडताच त्या खिडकीतही आगीचे लोट आले. आणि संपूर्ण बसला आगीने वेढले होते.
तिचे शैक्षणिक सत्र सुरू होणार होते; पण शेवट झाला
अमरावती : अपघातातील मृतांमध्ये अमरावती जिल्ह्यातील जळगाव मंगरूळ (ता. धामणगाव रेल्वे) येथील युवतीचा समावेश आहे. राधिका महेश खडसे (२२) असे मृताचे नाव आहे. ती एमबीएला पुण्यात प्रवेशित होती. सोमवारी शैक्षणिक सत्र सुरू होणार होते. शेतकरी असलेल्या खडसे कुटुंबाने मुलींच्या शिक्षणासाठी काही वर्षांपूर्वी वर्धेला स्थलांतर केले. तेथूनच ती समृद्धी महामार्गाने पुण्याला निघालेल्या या खासगी बसमध्ये चढली होती. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तिचे कुटुंबीय अपघातस्थळी गेले.
काय करावं, सुचतच नव्हते
रात्री दीड वाजताच्या दरम्यान माझा मित्र साईनाथ पवार याने मला व अन्य एका मित्राला झाेपेतून उठविले. बसमध्ये अंधार हाेता. काही कळायच्या आत बसने पेट घेतला. पाहता पाहता बस चाेहाेबाजूंनी पेटली. सर्व जीवाच्या आकांताने मदतीसाठी धावत हाेते. त्यात बसचे दरवाजे बंद असल्याने काय करावे, आम्हाला काहीच सूचत नव्हते. बसच्या काचा फाेडण्याचा प्रयत्न केला. अखेर आणखी एका मित्राची मदत घेऊन आम्ही जीवाच्या आकांताने बसच्या मागील बाजूच्या काचांना लाथा मारल्या. अथक प्रयत्नानंतर काच फुटल्याने आम्ही बाहेर पडलाे. समृद्धीने जाणाऱ्या एकाही वाहन चालकाने वाहन थांबवून मदत केली नाही.
- याेगेश रामराव गवई, रा.भालेगाव, ता.मेहकर, जखमी
जीवंत माणसे डोळ्यासमोर जळत होती...: रात्री एक वाजताच्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज कशाचा म्हणून मी फार्म हाऊसमधून बाहेर पडलो. पाहतो तर आगीच्या ज्वालात बस धगधगत होती़. समोरच्या खिडकीतून चार ते पाच व्यक्तींनी उड्या मारून आपला जीव कसाबसा वाचविला. बसमधील महिलांचा टाहो ऐकायला आला. त्यात मोठमोठे स्फोट होत असल्याने आतील आवाजही बंद झाले . जिवंत माणसे डोळ्यासमोर जळत होती. परंतु सर्वकाही अशक्यप्राय होते. केवळ धगधगत्या बसकडे बघून हृदय हेलावत होते. - दत्तू घुगे, प्रत्यक्षदर्शी
दत्तक घेतलेल्या ओवीसह आई अन् आजीही झाली गतप्राण
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या पिंपळखुटा गावानजीक झालेल्या भीषण अपघातात वृषाली वनकर, शोभा वनकर आणि ओवी वनकर या तिघांचाही मृत्यू झाला आहे. मृत वृषाली वनकर ही तेजस पोफळे याच्या आत्याची मुलगी असून, मृत शोभा वनकर या वृषालीच्या सासू आहेत. तर सुमारे एक वर्षाची ओवी हिला
वृषाली आणि वृषालीच्या पतीने काही महिन्यांपूर्वी दत्तक घेतले होते, असे सांगण्यात आले.