सिरसगावात होते खुलेआम दारूविक्री
By Admin | Updated: January 31, 2015 23:26 IST2015-01-31T23:26:07+5:302015-01-31T23:26:07+5:30
वर्धेसह चंद्रपूर जिल्ह्यातही दारूबंदीचा निर्णय शासनाने घेतला; पण ही जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याच सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यासह सिरसगाव येथे खुलेआम दारूविक्री होत आहे़

सिरसगावात होते खुलेआम दारूविक्री
अल्लीपूर : वर्धेसह चंद्रपूर जिल्ह्यातही दारूबंदीचा निर्णय शासनाने घेतला; पण ही जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याच सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यासह सिरसगाव येथे खुलेआम दारूविक्री होत आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
सामान्य माणसांचे कुटुंब, संसार उद्ध्वस्त होऊ नये, तरूणांना व्यसनापासून दूर करून भांडणे कमी व्हावी, घरा-घरांतील कलह दूर व्हावे, सर्वत्र शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला; पण आपला संसार सुखी व्हावा म्हणून हप्ता घेऊन गावात दारू विकण्याची अलिखीत संमती मिळत असल्याने वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिरसगाव (बाजार) येथे दारूची खुलेआम विक्री होत आहे़ पोलीस कर्मचारी त्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय मंगेकर व सरपंच मनीषा देवतळे यांनी निवेदनातून केला आहे़ तंटामुक्ती समितीला बीट जमादार सहकार्य करीत नसून दारूबंदीसाइी प्रयत्न केले असता ते उधळून लावण्याचे प्रयत्न वडनेर पोलिसांकडून होत असल्याचा आरोपही सरपंच देवतळे यांनी केला आहे.
शुक्रवारी बाजाराच्या दिवशी बाजाराजवळच मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते़ यामुळे मद्यपिंचा बाजारात धुमाकूळ सुरू असतो़ यामुळे भांडणांचे प्रमाण वाढले आहे. सामान्य नागरिक व महिलांना मद्यपिंमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ मागील वर्षी स्वातंत्र्य दिनी झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला होता़ ठरावाची प्रत वडनेर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती; पण वसुलीच्या प्रेमापोटी पोलिसांनी सहकार्य केले नाही, असा आरोपही केला आहे़ याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे़(वार्ताहर)