संतापजनक घटना; दोन सख्ख्या बहिणींसह अन्य एकीचे लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 15:20 IST2022-02-19T14:54:28+5:302022-02-19T15:20:05+5:30
वर्ध्यात एका ६५ वर्षीय म्हातारीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच तीन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने वर्धा जिल्ह्याला हादरा बसला आहे.

संतापजनक घटना; दोन सख्ख्या बहिणींसह अन्य एकीचे लैंगिक शोषण
वर्धा : दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींसह आणखी एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना गिरड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात १८ फेब्रुवारी रोजी रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
वर्ध्यात एका ६५ वर्षीय म्हातारीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच तीन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने वर्धा जिल्ह्याला हादरा बसला आहे. गिरड पोलिसांनी आराेपी नराधमास अटक केल्याची माहिती आहे. केशव बावसू वानखेडे (५६) रा. माकुना सावळी, ता. चिमूर जि. चंद्रपूर असे अटक केलेल्या विकृत नराधमाचे नाव आहे.
आरोपी केशव वानखेडे हा लोखंडी पिपे विक्रीचे काम करतो. विविध गावांत जाऊन तो लोखंडी पिपे विकायचा. अशाताच तो गिरड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात दाखल झाला. गावातील रस्त्याकडेला तो पिपे विकायचा. अशातच त्याच्या नजरेस दोन सहा वर्षाच्या दोन सख्ख्या बहिणी आल्या. त्याने अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाचा फायदा घेत रस्त्याकडेला असलेल्या एका ओसाड पडीक जागेवर असलेल्या बाथरुममध्ये नेत रात्रीच्या काळोखात दोन्ही सख्ख्या बहिणींचे लैंगिक शाेषण केले. तो नराधम ऐवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आणखी एक सात वर्षीय मुलीचेही लैंगिक शोषण केले.
दोन्ही बहिणींनी ही संतापजनक घटना तिच्या आई वडिलांना सांगितली असता हा सर्व प्रकार उजेडात आला. पीडित बालिकांच्या आईवडिलांनी थेट गिरड पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी आराेपी केशव बावसू वानखेडे याच्याविरुद्ध ३७६ (अ), (ब) तसेच पॉस्कोच्या ४,६,८,१० कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.