Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:43 IST2025-11-28T13:42:14+5:302025-11-28T13:43:44+5:30
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असलेल्या एका भाजप उमेदवारावर तीन जणांना प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.

Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
BJP Candidate Attacked : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रचारादरम्यान, गुन्हेगारी घटनाही घडत आहेत. निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना वरोरा येथे भाजप उमेदवारावर हल्ला करण्यात आला. प्रभाग क्रमांक ५ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असलेल्या भाजप उमेदवार अनिकेत धनराज नाकाडे (वय ३५) यांच्यावर बुधवारी सायंकाळी ५ वाजता हल्ला झाला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अचानक झालेल्या शाब्दिक वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.
भाजप उमेदवारासोबत काय घडले?
अनिकेत नाकाडे दुपारी समर्थकांसह दत्त मंदिर वार्डात प्रचार करत होते. दरम्यान शुभम टोरे आणि अनिकेत नाकाडे यांच्यात अश्लील शिवीगाळ झाल्यामुळे वाद झाला. काही वेळातच शुभम टोरेने आपल्या सहकारी अमोल मडावी आणि गोलू मडावी यांसह नाकाडे यांच्यावर हल्ला करून जबर मारहाण केली.
तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी नाकाडे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला. हल्ल्यात नाकाडे यांना दुखापत झाली. वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि तातडीने त्यांना पोलिसांनी अटक केली. भाजपा विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अंबरनाथमध्येही भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला
अंबरनाथ अंबरनाथ पालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमधील भाजप उमेदवार प्रजेश तेलंगे यांच्या भावावर बुधवारी रात्री कोयत्याने हल्ला झाला.
शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याने प्रचार वादातून हा हल्ला केल्याचा आरोप जखमी सत्यम तेलंगे याने केला आहे. त्यामुळे शिंदेसेना, भाजपमधील संघर्ष वाढला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
'जाणिवपूर्वक केला अडकवण्याचा प्रयत्न', भोईर यांचा आरोप
हल्ला करणारा शिंदेसेनेचा उमेदवार शैलेश भोईर यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप सत्यमने केला आहे. साहिल याला मी ओळखत नाही. या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसून जाणीवपूर्वक खोटे आरोप करत मला अडकवले जात असल्याचे शैलेश भोईर यांनी सांगितले. या प्रकरणात अंबरनाथ पोलिसांनी साहिल वडनेरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.