हिंदी विद्यापीठात घोषणा देत महापुरुषांचा अपमान? वसतिगृहातून दहा विद्यार्थ्यांना केले निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:53 IST2025-11-13T12:52:50+5:302025-11-13T12:53:50+5:30
महापुरुषांचा अपमान करण्यात आल्याची तक्रार : हिंदी विद्यापीठ प्रशासनाची कारवाई

Insulting great men by raising slogans in Hindi University? Ten students suspended from hostel
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिल्ली येथील जेएनयूविद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीचा निकाल लागताच वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदीविद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वसतिगृह परिसरात विजयोत्सव साजरा केला. दरम्यान त्यांनी घोषणाबाजी करीत महापुरुषांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत विद्यापीठ प्रशासनाने दहा विद्यार्थ्यांना १४ दिवसांसाठी वसतिगृहातून निलंबित करण्याचा मंगळवारी आदेश पारित केला.
विद्यापीठाच्या निलंबन आदेशामध्ये धनंजय सिंह (रा. रामपूर, मध्य प्रदेश), अश्विनी सोनकर (रा. चौंबे घाट, उत्तर प्रदेश), कौशल कुमार (रा. मुबारकपूर, बिहार), बृजेश सोनकर (रा. कौशाम्बी, उत्तर प्रदेश), कर्णवीर सिंह (रा. नया बांस एटा, उत्तर प्रदेश), राकेश अहीरवार (रा. पानोठा, मध्य प्रदेश), धर्मेंद्र कुमार (रा. कटेरा, उत्तर प्रदेश), मनीष चौधरी (रा. सराय मोहन, उत्तर प्रदेश), सत्येंद्र राय (रा. दैना, उत्तर प्रदेश) व अभिजित कुमार (रा. भीखमपूर, बिहार) यांच्या नावांचा समावेश आहे.
दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठाचा निकाल लागल्यानंतर गुरुवारी रात्री विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी राजगुरू वसतिगृह ते रॅली वसतिगृह प्रवेशद्वारापर्यंत काढली. यावेळी त्यांनी महापुरुषांच्या घोषणा दिल्या. मात्र, यावेळी विद्यापीठातील काही संघटनांनी शुक्रवारी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार दिली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने शुक्रवारी संध्याकाळी विद्यार्थ्यांना मेलद्वारे नोटीस पाठविल्या व त्यांचा आपले मत तीन दिवसांच्या आत ठेवण्यास सांगितले.
विद्यापीठाला शनिवारी व रविवारी सुटी असल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी सोमवारी प्रशासनाच्या समोर लिखित स्वरूपात पक्ष मांडला. त्यानंतर मंगळवारी विद्यापीठ प्रशासनाने निलंबित करण्याचे आदेश काढले.
"जेएनयू विद्यापीठात लेप्ट जिंकल्यानंतर आम्ही वसतिगृह परिसरात घोषणा दिल्या. ज्या नेहमीच घोषणा दिल्या जातात, त्याच घोषणा याहीवेळी देण्यात आल्या. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने पूर्वग्रहीत धरून आमचे वसतिगृहातून निलंबन केले."
- धनंजय सिंह, निलंबित विद्यार्थी
"विद्यापीठ परिसरात रॅली काढून घोषणाबाजी करताना महापुरुषांचा अपमान करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाकडून संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचा पक्ष ठेवण्यासाठी वेळ दिला होता. त्या सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतर त्यांच्या विरुद्ध ही निलंबनाची कारवाई करण्यात आली."
- कादर नवाज खान, कुलसचिव, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा