चौथीच्या विद्यार्थ्यांना ५००० तर सातवीच्या साडेसात हजारांची शिष्यवृत्ती मिळणार; कधीपासून होणार लागू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 19:33 IST2025-11-01T19:31:32+5:302025-11-01T19:33:30+5:30
गुणवत्तेत होणार वाढ : पालकांची आर्थिक चिंता होणार कमी, विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर

Fourth grade students will get a scholarship of Rs 5,000 and seventh grade students will get a scholarship of Rs 7,500; when will it be implemented?
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवीऐवजी चौथी आणि इयत्ता आठवीऐवजी इयत्ता सातवीमध्ये करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून होणार आहे. या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले असून त्यांची आर्थिक चिंता थोडीफार कमी होण्यास मदत मिळणार आहे.
या बदलामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतही सुधारणा होईल, असा विश्वास शिक्षण खात्याने व्यक्त केला आहे. आता या परीक्षेच्या नावात सुधारणा करून प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असे म्हटले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा आणि विद्यार्थी व शिक्षकांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, या हेतूने परीक्षेच्या नियमांत बदल केले आहेत. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. त्यांची आर्थिक चिंता कमी होणार आहे.
चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून चौथीतील विद्यार्थ्यांना ५ हजार आणि सातवीतील विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
कशामुळे केला बदल ?
पूर्वी पाचवी आणि आठवीमध्ये परीक्षा घेतल्याने अभ्यासक्रम बदलामुळे विद्यार्थ्यांना अडचण येत होती. ही परीक्षा आता चौथी व सातवीसाठी करण्यात आली आहे..
कधीपासून होणार लागू
नवीन सुधारित शिष्यवृत्ती रचना २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून अमलात येईल. त्यानुसार पुढील सत्रातील परीक्षांसाठीचे वेळापत्रक शिक्षण विभाग लवकरच जाहीर करणार आहे.
शिष्यवृत्तीसाठी पात्रता आणि अटी काय ?
शासनमान्य शाळांमधील विद्यार्थी पात्र असतील. विद्यार्थ्यांनी मागील वर्षातील सर्व विषयांत समाधानकारक गुण मिळवलेले असावेत. ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळांना या योजनेचा लाभ घेता येईल. प्रत्येक तालुक्यातून निवडक संख्येने विद्यार्थी निवडले जाणार आहे..
यंदा कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना बसता येणार?
२०२५-२६ मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेला चालू शैक्षणिक वर्षातील पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना बसता येईल. पुढील वर्षापासून अनुक्रमे चवथी व सातवीसाठी हा नियम लागू राहील.
कोणत्या वर्गासाठी किती शिष्यवृत्ती ?
चवथी विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. मुर्लीसाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रोत्साहन घटक विचारात घेतला जाईल.
केव्हा होणार परीक्षा ?
शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीत घेण्यात येते. वर्ष २०२६ ची परीक्षा देखील त्या वेळापत्रकानुसारच होणार असून परीक्षेचे अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध राहील.
"शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना दिली जाणार आहे. लहान वयात स्पर्धात्मक परीक्षेचा अनुभव विद्यार्थ्यांना येईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक होणार आहे."
- पंकज तायडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, आर्वी