सीसीआयने केली ५.९ लाख क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:09+5:30

हिंगणघाट येथे १ लाख २५ हजार क्विंटल, देवळी १ लाख ५२ हजार ३०० क्विंटल, वायगाव येथे ५० हजार क्विंटल, खरांगणा येथे ५ हजार क्विंटल, रोहणा येथे ४० हजार क्विंटल, सेलू येथे ४५ हजार क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे ३० हजार व समुद्रपूर येथे ६२ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली आहे. या कापसापासून १ लाख एक हजार ५०० कापूस गाठींची निर्मिती जिल्ह्यात करण्यात आली.

CCI buys 5.9 lakh quintals of white gold | सीसीआयने केली ५.९ लाख क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी

सीसीआयने केली ५.९ लाख क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी

Next
ठळक मुद्देजागेअभावी केंद्र बंद करण्याची वेळ : जादा भावामुळे शेतकऱ्यांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेने जिल्ह्यातील आठ कापूस खरेदी केंद्रांवर ५ लाख ९ हजार ८०० क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. येथे कापसाला खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव दिला जात असल्याने या केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक होऊन केंद्र जागेअभावी बंद करण्याची वेळ आली आहे.
हिंगणघाट येथे १ लाख २५ हजार क्विंटल, देवळी १ लाख ५२ हजार ३०० क्विंटल, वायगाव येथे ५० हजार क्विंटल, खरांगणा येथे ५ हजार क्विंटल, रोहणा येथे ४० हजार क्विंटल, सेलू येथे ४५ हजार क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे ३० हजार व समुद्रपूर येथे ६२ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली आहे. या कापसापासून १ लाख एक हजार ५०० कापूस गाठींची निर्मिती जिल्ह्यात करण्यात आली. राज्य सरकारचा पणन महासंघ व खासगी व्यापारी यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या भावापेक्षा दोनशे रुपयांनी सीसीआयचा भाव अधिक आहे. सध्या ५ हजार ४५० रुपये भाव सीसीआयकडून दिला जात असल्याने शेतकरी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस आणत आहे.

कासवगती खरेदीचा भुर्दंड शेतकऱ्यांची माथी
रोहणा : येथील ग्लोबल कोटस्पीनमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. परंतु, शेतमाल खरेदीही ही प्रक्रिया अतिशय कासवगतीने होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नव्हे तर कापूस भरलेली वाहने दोन-दोन दिवस उभी ठेवावी लागतात. त्या वाहनांचे भाडे मात्र शेतकऱ्यांना अदा करावे लागत आहे. सीसीआयच्या या कापूस खरेदी केंद्रावर परिसरातील शेतकरी मालवाहूने तसेच बैलबंडीने कापूस विक्री करीता आणतात. मात्र, कापूस खरेदी कासवगतीने होत असल्याने बैलांसाठी वैरणही शेतकऱ्यांना सोबत घेऊन यावे लागत आहे. जागेसह इतर कारणे पुढे करून कापूस खरेदीच्या गतीलाच बे्रक लावल्या जात आहे. दिवसभऱ्यात केवळ २० मालवाहू आणि दहा बैलगाडीमधील कापसाची खरेदी केली जात आहे. एकूणच ५०० क्विंटलच्यावर कापूस खरेदी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुंर्दंड सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर सीसीआयच्या खरेदी केंद्रावर रात्र काढावी लागत आहे. सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविण्यात येत असल्याने अनेक शेतकरी नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांना कापूस देताना दिसतात. या सर्व प्रकाराचा फायदा घेत व्यापारीही कपाशी उत्पादकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे बघावयास मिळते.

कापूस भरलेली बैलगाडी २४ फेबु्रवारीला सकाळी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर नेण्यात आली. त्याच दिवशी हा कापूस खरेदी होणे क्रमप्राप्त होते. पण विविध कारणे पुढे करून २५ फेब्रुवारीला दुपारी कापूस खरेदी करण्यात आला.
- मंगेश सुपनार, शेतकरी, रोहणा.

कापूस साठविण्यासाठी जिनिंगमध्ये जागा नाही. शिवाय जागा सध्या कमी पडत असून मजुरांचा अभाव आहे. त्यामुळे खरेदीची गती मंदावली आहे. खरेदी बंद होणार ही अफवा आहे.
- नंदकिशोर सोकोये, केंद्र प्रमुख, सीसीआय.

Web Title: CCI buys 5.9 lakh quintals of white gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस