जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 07:40 IST2025-04-20T07:35:52+5:302025-04-20T07:40:36+5:30
सेलू तालुक्यातील हिंगणीलगतच्या एका गावात शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. आरोपीने आपल्या ११ सहकाऱ्यांना घेऊन संबंधित युवतीच्या घरावर सशस्त्र हल्ला करत तिला बळजबरीने पळवून नेले.

जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
सेलू (वर्धा) : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल होऊन जेलमध्ये असलेल्या आरोपी युवकाला जामीन मिळताच त्याने आपल्या ११ सहकाऱ्यांना घेऊन संबंधित युवतीच्या घरावर सशस्त्र हल्ला करत तिला बळजबरीने पळवून नेले.
सेलू तालुक्यातील हिंगणीलगतच्या एका गावात शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असून, पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेतले. तसेच कार आणि दुचाकीही जप्त केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
तलवारी आणि रॉडने केला हल्ला
पीडित कुटुंब शुक्रवारी रात्री झोपले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हल्लेखोर चारचाकीतून गावात दाखल झाले. काही कळायच्या आत तरुणांनी तलवार, चाकू तथा लोखंडी राॅडने त्या कुटुंबाच्या घरावर हल्ला केला.
मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिचे आई, वडील जखमी झाले. नंतर हल्लेखोरांनी अल्पवयीन युवतीला फरफटत नेले. तिला वाहनात जबरदस्तीने बसवत पोबारा केला. याप्रकरणी तक्रारीवरून वैभव थूल व इतर ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
शेजारची घरे केली होती बंद
हल्लेखोरांनी आजूबाजूला असलेल्या घरांची दारे बाहेरून बंद करून ठेवली होती. लगतच्या एका शेजाऱ्याने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. त्याच्या घराच्या फाटकावर हल्लेखोरांनी तलवार आपटली.