गावगुंडांचा सशस्त्र दरोडा, तोडफोड करून रोख हिसकावली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:50 PM2023-06-27T12:50:04+5:302023-06-27T12:52:00+5:30

कारला चौकातील घटना : पोलिसांची क्विक ॲक्शन, अटकेतील आरोपींत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा समावेश

Armed robbery of village gangsters, extortion of money by vandalism; Incident at Karla Chowk of Wardha | गावगुंडांचा सशस्त्र दरोडा, तोडफोड करून रोख हिसकावली

गावगुंडांचा सशस्त्र दरोडा, तोडफोड करून रोख हिसकावली

googlenewsNext

वर्धा : शहरातील कारला चौकात वावरणाऱ्या गावगुंडांनी काही दिवसांपासून दहशत पसरविण्याचा प्रकार चालविला आहे. आजही या गावगुंडांच्या टोळक्याने चक्क बायपास मार्गालगत असलेल्या एका हॉटेलवर सशस्त्र हल्ला चढवून दोन हजार रुपये हिसकावून नेले. इतक्यावरच न थांबता त्यांनी कारला चौकातील पेट्रोलपंप आणि एका पानटपरीचीही तोडफोड केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी क्विक ॲक्शन घेऊन चार आरोपींना अटक केली.

राजेंद्रसिंग ऊर्फ गुड्डूसिंग लखनसिंग जुनी, रवींद्रसिंग ऊर्फ कालूसिंग लखनसिंग जुनी, लीलाधर ऊर्फ लकी धर्मदेव कुंमरे, अतुल अंकुश निमसडे या चौघांना अटक करण्यात आली असून, उज्ज्वला गणेश गवळी या युवतीला ताब्यात घेतले आहे. आकाश किसन ढोक हा जखमी असून, रुग्णालयात उपचार घेत आहे तर आणखी एकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सातही जणांच्या टोळक्याने दुपारी ४ वाजताच्या सुमारास बायपासलगतच्या शुभम मांडवगडे यांच्या ग्रीन सिटी हॉटेलमध्ये सशस्त्र हल्ला चढवून तोडफोड केली. तसेच तेथील गल्ल्यातून दोन हजार रुपये काढून घेतले. तलवारी नाचवून मारण्याची धमकी दिल्याने हॉटेलातील कर्मचारी घाबरून पळाले. त्यानंतर त्यांनी कारला चौकातील पवनसूत पेट्रोलपंपावर जाऊन तोडफोड केली. इतकेच नाहीतर, पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातातील पैसे हिसकाविण्याचा प्रयत्न केला. येथील मॅनेजर कॅश घेऊन बँकेत गेल्यामुळे रोकड वाचल्याचे पेट्रोलपंप मालकाने सांगितले. येथे तोडफोड करून काही हाती लागले नसल्याने लगेच त्यांनी लगतच्या सागर बाकडे यांच्या मालकीच्या ‘तांबूल’ पान शॉपीची तोडफोड केली. या सर्व प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

यातील काही आरोपी परिसरातील एका खासगी रुग्णालयात तर काही जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन धुमाकूळ घालीत होते. या प्रकारानंतर पोलिसांचे फोन खणखणू लागताच तातडीने तपासचक्र फिरवून चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. अटकेतील आरोपींना रामनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

पेट्रोलपंपावरील मोठा अनर्थ टळला

कारला चौकातील पवनसूत पेट्रोलपंपावर नियमित पेट्रोल भरण्याचे काम सुरू असतानाच साडेचार वाजताच्या सुमारास दोन गुंडांनी येऊन ‘अग्निशमन सिलिंडर’ फेकले. तेव्हा एक महिला आपल्या मोपेडमध्ये पट्रोल भरत असताना तिच्या गाडीला जाऊन भिडले. त्यानंतर या आरोपींनी तिची गाडी ओढण्याचा प्रयत्न केला. ते सिलिंडर जर महिलेला लागले असते तर मोठा अनर्थ घडला असता. तसेच बाजूला पेट्रोलटँकर उभा होता, त्यामुळे धोक्याची शक्यता मोठी होती.

टोळक्याची गुंडागर्दी नित्याचीच

राजेंद्रसिंग ऊर्फ गुड्डू सिंग जुनी आणि त्याच्या टोळक्याची कारला चौक परिसरात दादागिरी नित्याचीच असल्याचे तेथील नागरिकांनी घटनास्थळी बोलून दाखविले. पेट्रोलपंपासह लगतच्या दुकानांत हप्ते वसूल करणे, धमकावणे, देणगीच्या नावावर वसुली करणे, पैसे न देता पेट्रोल-डिझेल घेऊन जाणे, कुणी हटकले तर त्यांच्यावर हल्ला करून शस्त्राचा धाक दाखविणे असे प्रकार चालविले आहेत. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारात कारला चौकात हातात नंग्या तलवारी नाचविल्याचेही नागरिक बोलू लागले होते. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच ठेचण्याची वेळ आहे अन्यथा सामान्य नागरिकांचे जगणे कठीण होईल, असे नागरिकांनी सांगितले.

घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

सहा युवक आणि एक युवती या टोळक्याचा सुरुवातीला बायपासलगतच्या हॉटेल ग्रीन सिटीसमोर वाद झाला. यानंतर या सर्वांनी हातात तलवारी, काठ्या व लोखंडी रॉड घेऊन हॉटेलमध्ये धुमाकूळ घालून तोडफोड केली. त्यानंतर सर्वच जण दुचाकीवर बसून निघून गेले. यातील दोन युवक पायदळ येऊन पेट्रोलपंपात शिरले. येथेही धुमाकूळ घालून फेकाफेक केली. कर्मचाऱ्यांजवळून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगतच्या पानटपरीवर तोडफोड केली. यादरम्यान आणखी दोघे दुचाकीवरून हातात तलवार घेऊन आले आणि त्यांनी पेट्रोलपंपाची मशीन आणि कार्यालयाची तोडफोड केली. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे.

Web Title: Armed robbery of village gangsters, extortion of money by vandalism; Incident at Karla Chowk of Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.