वाळू माफियाविरुद्ध आता पोलीस व महसूल विभागाचा शंखनाद
By Admin | Updated: July 5, 2015 01:11 IST2015-07-05T01:11:15+5:302015-07-05T01:11:15+5:30
विशेष पथकाची नियुक्ती, अवैध वाळू वाहतूक होणार नाही, अवैध वाळूसाठा जप्तीचे आदेश वर्धा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे;

वाळू माफियाविरुद्ध आता पोलीस व महसूल विभागाचा शंखनाद
आशुतोष सलील यांची माहिती : विशेष पथकाची नियुक्ती, अवैध वाळू वाहतूक होणार नाही, अवैध वाळूसाठा जप्तीचे आदेश
वर्धा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे; मात्र तालुकास्तरावरील यंत्रणेकडून आळा घालण्याऐवजी त्याला खतपाणी घालत असल्याचेच दिसून येत होते. यामुळे वर्धा नदीसह मोठ्या नाल्यांचे पात्रच धोक्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी वाळू माफियांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेशच शनिवारी दिले आहेत. इतकेच नव्हे, तर यापुढे पोलीस आणि महसूल विभाग संयुक्त कारवाई करुन वाळू माफियांना जेरीस आणणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल तसेच महसूल व पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक बोलाविली होती. यावेळी अवैधपणे वाळूचे उत्खनन तसेच वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर पोलीस व महसूल विभागातर्फे संयुक्तपणे कडक कारवाईच्या सूचना दिल्यात.
अवैध वाळूसाठा, वाळू उत्खनन व वाहतूक यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी व महसूल उपविभागीय अधिकारी यांनी संयुक्तपणे कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करावे, अशा सूचना देताना जिल्हाधिकारी आशुतोष सलील म्हणाले, अवैध वाळूसाठा, वाहतूक व उत्खननासंदर्भात दोन्ही विभागाने समन्वयाने कारवाई करून त्याचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे नियमित पाठविण्यात यावा. प्रत्येक तालुक्यात लगेच कारवाईला सुरुवात करण्याचे निर्देशही दिलेत.
महसूल विभागातील अधिकारी आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी आठवड्यात किमान एकदा बैठक घेवून प्रशासनासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करावी. हद्दपार करण्यात येणाऱ्या व्यक्तीबाबतही गुणात्मक प्रस्ताव दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी दोन्ही विभागाने समन्वयाने कार्य करून प्रशासनास अधिक गतीमान करावे. येणाऱ्या अडचणींबाबत तत्काळ संपर्क साधावा. संवाद वाढविण्यावर भर द्यावा. अवैधपणे कार्य करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात यावी. कारवाईचा अहवालही पाठविण्यााचे यावेळी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनीही उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार उपस्थिती होते.(जिल्हा प्रतिनिधी)