११ हजार ८५१ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:01:30+5:30
शेतकऱ्यांकडून ओरड व्हायला लागल्याने प्रशासकीय यंत्रणेकडून कुठे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तर कुठे कार्यालयात बसूनच पंचनामे करीत नुकसानीची आकडेवारी जाहीर केली. त्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला मात्र, आता जुना हंगाम संपून नवीन हंगाम सुरु झाला तरीही जिल्ह्यातील ११ हजार ८५१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

११ हजार ८५१ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गेल्यावर्षीच्या २०१९-२० च्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांकडून ओरड व्हायला लागल्याने प्रशासकीय यंत्रणेकडून कुठे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तर कुठे कार्यालयात बसूनच पंचनामे करीत नुकसानीची आकडेवारी जाहीर केली. त्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला मात्र, आता जुना हंगाम संपून नवीन हंगाम सुरु झाला तरीही जिल्ह्यातील ११ हजार ८५१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे या हंगामात तरी भरपाई मिळणार काय? असा प्रश्न नैसर्गिक आपत्तीग्रस्तांकडून विचारल्या जात आहे.
शेतकरी आणि आपत्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागतो. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यानंतरही पावसाचा जोर कायमच होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा फटका सहन करावा लागला. त्यानंतरही अवकाळी पाऊस व गारपीटाचा तडाखा कायमच राहिला. परिणामी उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांनी रबी हंगावर आपले लक्ष केंद्रीत करुन मेहनत घेतली. त्यावरही अवकाळी पावसाने दणका दिल्याने पिके जमिनदोस्त झाली. मागील वर्षी जुलै महिन्यापासून तर यावर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत जवळपास १५ हजार ५८९ शेतकऱ्यांचे १२ हजार ९३६ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपिटामुळे नुकसान झालेत. जिल्हा प्रशासनाकडून याचे पंचनामे करुन शासनाला अहवाल पाठविला. या सर्व शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याकरिता ९ कोटी ८८ लाख ७८ हजार २३८ रुपयांची आवश्यकता असल्याचे जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविले होते. वर्षभरात शासनाकडून केवळ १ कोटी ६५ लाख ७६ हजार ५६० रुपये प्राप्त झाले असून ते शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले. जुन्या हंगामातील नुकसान भरपाईकरीत नवीन हंगामही उजाडला असून तब्बल ८ कोटी २३ लाख १ हजार ६७६ रुपये शासनाकडून येणे बाकी असल्याने शेतकºयांच्या नजरा लागल्या आहेत.
डिसेंबर, जानेवारीत सर्वाधिक नुकसान
जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये डिसेंबर व जानेवारी महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या कालावधीत जिल्ह्यातील ८ हजार ६४० शेतकऱ्यांचे ८ हजार ८०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याचाही तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन अहवाल सादर केला होता. त्यामुळे ८ हजार ६४० शेतकऱ्यांना ६ कोटी ५२ लाख १६ हजार ८७२ रुपयाची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होती. पण, यातील एक रुपयाचाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही, हे दुदैवच म्हणावे लागेल.
राज्यसह केंद्र सरकारही कोविड-१९ या आपत्तीचा सामना करत आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने शासनाने इतर शासकीय कार्यालयात अखर्चित असलेला निधी परत मागितला आहे. त्यामुळे शासनाची अवस्था या काळात बिकट असल्यामुळे ते शेतकऱ्यांना तरी नुकसान भरपाईची मदत देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.