Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:32 IST2025-11-28T13:31:00+5:302025-11-28T13:32:30+5:30
Uttarakhand Elephant Attack News: उत्तराखंडमधील डेहराडून येथील रायपूर ठाणे रोड परिसरात जंगलातून रस्त्यावर आलेल्या हत्तीने कुटुंबावर हल्ला केला.

Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
उत्तराखंडमधील डेहराडून येथील रायपूर थाना रोड परिसरात जंगलातून रस्त्यावर आलेल्या हत्तीने कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात १२ वर्षाचा मुलगा ठार झाला. तर, आई-वडिलांनी खड्ड्यात उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. ही घटना गुरुवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोईवाला येथील कोठारी मोहल्ला येथील रहिवासी असलेले एक दाम्पत्य आपल्या १२ वर्षाच्या मुलासह औषध खरेदी करून स्कूटरवरून आपल्या घरी परतत होते. स्कूटर कालू सिद्ध मंदिराजवळ येताच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका हत्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हत्तीने मुलाला स्कूटरवरून खाली खेचले आणि जमिनीवर आपटले. त्यानंतर पायाखाली चिरडले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. सुदैवाने, आई-वडीलांनी रस्त्याजवळील खड्ड्यात उडी मारल्याने ते बचावले.
दरम्यान, मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर आग लावल्याने घाबरून हत्तीने तिथून पळ काढला. यानंतर, स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्यांनी आपल्या मुलाला तातडीने डोईवाला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. डेहराडूनच्या डीएफओने एका वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, विभागाने या परिसरातील स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. जंगलालगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचा आणि नेहमी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला. मानवी वस्तीजवळ हत्तींचा वावर वाढल्याने संपूर्ण रायपूर ठाणे रोड परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.