मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 18 लाख बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले; वाळवीने खाऊन घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 17:44 IST2023-09-26T17:43:19+5:302023-09-26T17:44:07+5:30
याप्रकरणी बँक चौकशी करणार आहे.

मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 18 लाख बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले; वाळवीने खाऊन घेतले
UP News: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत धक्कादायक प्रकार घडला आहे. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या 18 लाख रुपयांच्या नोटा वाळवीने खाल्ल्या. लॉकर उघडले असता ही बाब लक्षात आली. महिलेने लॉकरमध्ये रोख रक्कम आणि दागिने ठेवले होते. या घटनेनंतर महिलेने शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आशियाना येथील रहिवासी अलका पाठक यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुलीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे आणि दागिने बँक ऑफ बडोदाच्या रामगंगा विहार शाखेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अलकाला यांना केवायसीसाठी बोलावले. सोमवारी अलका पाठक बँकेत पोहोचल्या तेव्हा त्यांनी लॉकर उघडून पाहिले आणि त्यांना धक्का बसला. वाळवीने त्यांच्या सगळ्या नोटा खाल्ल्या.
लॉकरमध्ये पैसे ठेवता येत नाहीत, हे अलका पाठक यांना माहीत नव्हते. त्यांनी असा नियम कुठे वाचलाही नव्हता. त्यामुळेच त्यांनी दागिन्यांसह 18 लाख रुपये लॉकरमध्ये ठेवले. पण, वाळवीने त्यांचे सगळे पैसे खाऊन घेतले. बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने सांगितले की, याप्रकरणी अहवाल पाठवला आहे. अहवाल आल्यानंतर माहिती दिली जाईल.