युपीत अखिलेश यादव यांना मोठा धक्का; सपाच्या 7 आमदारांचे भाजपा उमेदवाराला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 22:18 IST2024-02-27T22:17:51+5:302024-02-27T22:18:34+5:30
उत्तरप्रदेशातील राज्यसभेच्या दहापैकी 8 जागांवर भाजपा, तर 2 जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी.

युपीत अखिलेश यादव यांना मोठा धक्का; सपाच्या 7 आमदारांचे भाजपा उमेदवाराला मतदान
Uttar Pradesh Rajya Sabha Election Result 2024 : आज, मंगळवार(दि.27) रोजी उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या 15 जागांसाठी निवडणुका झाल्या. यूपीमध्ये राज्यसभेच्या 10 जागांवर निवडणूक झाली, ज्यामध्ये भाजपचे उमेदवार 8 जागांवर तर समाजवादी पक्षाचे उमेदवार 2 जागांवर विजयी झाले. या सर्व 10 जागांसाठी 395 मतदारांनी मतदान केले आहे.
युपी राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे सुधांशू त्रिवेदी, आरपीएन सिंग, चौधरी तेजवीर सिंग, साधना सिंग, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत आणि नवीन जैन विजयी झाले आहेत. तर, समाजवादी पक्षाच्या जया बच्चन आणि पीडीएचे उमेदवार रामजीलाल सुमन यांनीही राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. दरम्यान, सपाचे तिसरे उमेदवार माजी आयएएस आलोक रंजन यांचा पराभव झाला आहे.
सपा आमदारांचे भाजपला मतदान
उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 जागांवर निवडणूक झाली. या 10 जागांसाठी 399 पैकी 395 मतदारांनी मतदान केले. माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्या पत्नी महाराजी देवी मतदानासाठी आल्या नाहीत. तसेच, समाजवादी पक्षाच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग केले. मिळालेल्या माहितीनुसार, सपाच्या 7 आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले, ज्यामुळे भाजपला आठ जागा मिळवण्यात यश आले.
सपामध्ये मोठा गोंधळ
मंगळवारी राज्यसभेच्या 10 जागांसाठी मतदान सुरू होताच समाजवादी पक्षात गोंधळ झाला. पक्षाचे चीफ व्हिप आणि उंचाहरचे आमदार मनोज पांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याशिवाय सपाच्या इतर चार आमदारांनीही जय श्री रामचा नारा देत क्रॉस मतदान केले. सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाच्या इतर काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले असून आता त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाणार आहे.