Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 10:41 IST2025-12-13T10:39:55+5:302025-12-13T10:41:10+5:30
Uttar Pradesh Anganwadi Worker Murder: वाराणसीतील लक्ष्मणपूर येथील शारदा विहार कॉलनीत एका एका अंगणवाडी सेविकेच्या निर्घृण हत्या करण्यात आली.

Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
वाराणसीतील लक्ष्मणपूर येथील शारदा विहार कॉलनीत एका एका अंगणवाडी सेविकेच्या निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा प्रियकर मोहित यादव आणि त्याची पत्नी अंजली चौहान यांना अटक केली आहे. मृत महिला तिला गर्भवती करण्यासाठी आरोपीवर दबाव आणत होती, तसेच पोलिसांत तक्रार देण्याची धमकीही देत होती, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहित यादव हा पूर्वी मृत महिलेच्या घराजवळ भाड्याने राहत होता. महिलेचा घरातून दूध विकण्याचा व्यवसाय होता. दूध खरेदीच्या निमित्ताने मोहितचे तिच्या घरी येणे-जाणे होते आणि याच दरम्यान त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले. मृत महिला विवाहित होती, मात्र तिला मूलबाळ नव्हते. तिने मुलासाठी मोहितवर दबाव आणण्यास सुरुवात केली. मोहितने नकार दिल्यास, ती पोलिसात तक्रार करण्याची धमकी देऊ लागली. या दबावामुळे मोहितने त्याची पत्नी अंजलीला संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर दोघांनी मिळून या महिलेला संपवण्याचा कट रचला.
हत्येचा कट रचल्यानंतर मोहित आणि अंजली एका होमस्टेमध्ये थांबले. दरम्यान, ११ डिसेंबर रोजी सकाळी दोघेही महिलेच्या घराकडे निघाले. अंजली घरासमोर थांबली. तर, मोहितने मागील दाराने महिलेच्या घरात प्रवेश केला. मोहितने महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने महिलेचे दागिने आणि कपाटातून रोख रक्कम चोरली आणि तिथून पळून गेला आणि पत्नीसह पुन्हा होमस्टेमध्ये परतला. यानंतर १२ डिसेंबर रोजी पळून जाण्याच्या उद्देशाने मोहित आणि अंजली शिवपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले असता, पोलिसांनी त्यांना अटक केली.
चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याच्या वेळी घातलेले कपडे झुडपात फेकल्याची कबुली दिली. पोलिसांनी मृत महिलेचे दागिने आणि रोख ७३ हजार ६४० रुपये त्यांच्या ताब्यातून जप्त केले आहेत. केवळ २४ तासांच्या आत हे किचकट प्रकरण सोडवणाऱ्या पोलीस पथकाला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.