Train Accident: उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना, पातालकोट एक्स्प्रेसला आग, दोन डबे जळाले, अनेकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 20:00 IST2023-10-25T19:49:52+5:302023-10-25T20:00:23+5:30
Burning Train In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील आग्र्याजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. येथे एका धावत्या ट्रेनला आग लागली आहे. पातालकोट एक्स्प्रेसला झालेल्या या अपघातात ट्रेनच्या दोन डब्यांना आग लागली आहे. ट्रेनला नेमकी आग कशी लागली हे समजू शकलेलं नाही.

Train Accident: उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना, पातालकोट एक्स्प्रेसला आग, दोन डबे जळाले, अनेकजण जखमी
उत्तर प्रदेशमधील आग्र्याजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. येथे एका धावत्या ट्रेनला आग लागली आहे. पातालकोट एक्स्प्रेसला झालेल्या या अपघातात ट्रेनच्या दोन डब्यांना आग लागली आहे. ट्रेनला नेमकी आग कशी लागली हे समजू शकलेलं नाही. मात्र आग लागल्यानंतर ट्रेनमधील प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला.
ही दुर्घटना मालपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भडाई रेल्वेस्टेशनजवळ घडली आहे. रेल्वेच्या पीआरओंनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, ट्रेनच्या दोन डब्यांमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. दरम्यान, या आगीमध्ये ट्रेनमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी होरपळल्याची प्राथमिक माहिती आहे.
ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांना एसएन मेडिकल कॉलेजमधील आपातकालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. तिन्ही प्रवासी हे १० ते १५ टक्के होरपळले आहेत. सर्वांना एसएन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.
या अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीमागचं कारण अद्यापतरी कळू शकलेलं नाही. तर दोन दब्यांना लागलेल्या आगीमुळे ही ट्रेन घटनास्थळावरच थांबवावी लागली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रेन आग्रा कँट रेल्वे स्टेशनवर पोहोचली आणि तिथून झाशीकडे रवाना झाली. काही किमी अंतरावर गेल्यावर ट्रेनच्या जनरल बोगीमध्ये धूर आणि आग दिसू लागली. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. आगीची माहिती मिळताच ड्रायव्हरने ट्रेन थांबवली आणि कंट्रोल रूमला माहिती दिली.