उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सहा वर्षाच्या चिमुकलीला हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी सख्ख्या मावशीला अटक केली. आरोपीने चिमुकलीला कुराण शिकवण्यासाठी आपल्या घरी घेऊन नेले होते. परंतु, आरोपी तिच्याकडून नोकरासारखे घरातील सर्व कामे करून घ्यायची. एवढेच नव्हे तर किरकोळ चुकांसाठी तिला बेदम मारहाण करायची, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मयत मुलगी सीतापूरच्या महमूदाबाद बिलासपूर येथील रहिवासी शमशुद्दीनची मुलगी आहे. शमशुद्दीन हा मजूर आहे. तीन महिन्यांपूर्वी इंदिरानगरच्या चंदन गावातील रहिवासी असलेल्या शमशुद्दीनची मेहुणी रुबिना ही त्याची सहा वर्षांची मुलगी आयशा हिला कुराण शिकवण्याच्या नावाखाली आपल्या सोबत घेऊन गेली. ८ जून रोजी सकाळी रुबिनाने शमशुद्दीनला फोन करून आयसाच्या मृत्यूची माहिती दिली. माहिती मिळताच शमशुद्दीन त्याच्या कुटुंबासह रुबिनाच्या घरी पोहोचला. रुबिनाने आयशाच्या मृत्युबद्दल तिच्या घरच्यांना काहीच सांगितले नाही. तिने फक्त गाडीची व्यवस्था केली आणि आयशाचा मृतदेह शमशुद्दीनसोबत पाठवून दिला.
गावात पोहोचल्यानंतर कुटुंबीय आयशाच्या अंतिम संस्काराची तयारी करताना तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळल्या. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टेममध्ये मुलीचा मृत्यू डोक्याला दुखापत झाल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. मुलीच्या शरीरावर सहा वेगवेगळ्या खुणा आढळल्या. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर, मुलीच्या वडिलांनी इंदिरानगर पोलिसांकडे जाऊन या प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रुबिनाला अटक केली.
आयशाच्या कुटुंबाचा आरोप आहे की, रुबिनाने कुराण शिकवण्याच्या नावाखाली आयशाला सोबत नेले होते. पण ती आयशाला नोकरासारखे घरातील कामे करायला लावायची. इतकेच नाही तर मुलीला किरकोळ चुकांसाठीही मारहाण देखील करायची. दरम्यान, पोलिसांनी आयशाला ज्या काठीने मारहाण केली, ती काठी देखील जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.