विकसित आणि समर्थ उत्तर प्रदेश स्वप्न बनले जनआंदोलन, 60 लाख लोकांनी केल्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:28 IST2025-11-03T18:25:28+5:302025-11-03T18:28:14+5:30
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संकल्पनेतून २०४७ पर्यंत उत्तर प्रदेशला विकसित राज्य बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी लोकांच्या सूचनाही मागण्यात आल्या. त्यात ६० लाख लोकांनी सहभाग घेतला.

विकसित आणि समर्थ उत्तर प्रदेश स्वप्न बनले जनआंदोलन, 60 लाख लोकांनी केल्या सूचना
उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशला 2047 पर्यंत विकसित राज्य बनवण्याचा निर्धार केला आहे. 'समर्थ उत्तर प्रदेश-विकसित उत्तर प्रदेश @2047: समृद्धीचे शताब्दी पर्व महा अभियान' असे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ही एक व्यापक लोकचळवळ बनत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत 60 लाखांहून अधिक सूचना (फीडबॅक) प्राप्त झाल्या आहेत, ज्यापैकी 75 टक्क्यांहून अधिक सूचना ग्रामीण भागातील लोकांनी केल्या आहेत.
समर्थ उत्तर प्रदेश-विकसित उत्तर प्रदेश @2047 या अभियानात राज्यातील ७५ जिल्ह्यांमध्ये नोडल अधिकारी आणि प्रबुद्ध नागरिकांनी विविध लक्ष्य गटांना (विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक, शेतकरी, स्वयंसेवी संस्था, कामगार संघटना, माध्यम प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक) भेटून संवाद साधला. राज्याच्या विकास वाटचालीवर आणि भविष्यातील रोडमॅपवर लोकांची मते जाणून घेण्यात आली.
६० लाख लोकांच्या सूचना
आतापर्यंत samarthuttarpradesh.up.gov.in या पोर्टलवर सुमारे ६० लाख सूचना (फीडबॅक) करण्यात आल्या आहेत. यातील ७५ टक्क्यांहून अधिक सूचना ग्रामीण भागातून मिळाल्या आहेत.
लोकांच्या मनात काय, प्रमुख सूचना आणि मागण्या वाचा
बुलंदशहरच्या रिकेश कुमार यांनी ग्रामीण भागात उद्योग आणि शिक्षणावर विशेष लक्ष देण्याची मागणी केली. पीपीपी मॉडेलद्वारे ग्रामीण भागातील तरुणांना प्राधान्य मिळाल्यास स्थलांतर थांबेल, असे त्यांनी सांगितले.
शकील खान यांनी राज्याला औद्योगिक केंद्र बनवण्यासाठी एमएसएमईला (MSME) सुलभ कर्ज, तांत्रिक सहकार्य आणि जिल्हा-आधारित उद्योग पार्कची गरज व्यक्त केली.
निगार फातिमा यांनी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम, हाय-टेक उत्पादन आणि महिला कौशल्य मिशनवर भर दिला. सीमा कुमारी यांनी भरतकाम, शिवणकाम आणि अगरबत्ती बनवणे यासारख्या कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्याची मागणी केली.
जोगिंदर सिंह यांनी शालेय स्तरापासूनच शिक्षण व्यावहारिक आणि कौशल्य-आधारित बनवण्याची मागणी केली, जेणेकरून तरुण आत्मनिर्भर होऊ शकतील.
अंकित गुप्ता यांनी माँ बेला देवी धाम आणि शनिदेव मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांच्या विकासावर जोर दिला. डॉ. सुनील शाह यांनी बेल्हा देवी मंदिराच्या आसपास कॉरिडॉर बांधण्याचा, तर रीता जयस्वाल आणि रामेंद्र त्रिपाठी यांनी पर्यटन स्थळांवर सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची गरज व्यक्त केली.
बलियाच्या गीता देवी यांनी खेलो इंडिया सारख्या कार्यक्रमांचा स्थानिक स्तरावर विस्तार करण्याची सूचना केली, तर प्रदीप कुमार यांनी गावांमध्ये डिजिटल लायब्ररी आणि रोजगार निर्मिती केंद्रे सुरू करण्याची मागणी केली.
प्रशासन आणि सुरक्षा
गाझियाबादच्या राजेश अग्निहोत्री यांनी स्वच्छ प्रशासन, चांगली कायदा सुव्यवस्था आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. बस्तीच्या शाइस्ता फिरोज यांनी महिला सुरक्षा, कौशल्य मिशन आणि बाल विकास योजनांना बळकटी देण्यावर जोर दिला.
अभियानातील महत्त्वपूर्ण आकडेवारी
प्राप्त झालेल्या सुमारे ६० लाख सूचनांपैकी, ३० लाख सूचना ३१ वर्षांखालील तरुणांनी दिल्या आहेत. विविध क्षेत्रांतील सूचनांमध्ये कृषी (१६ लाख) आणि शिक्षण (१५ लाख) हे सर्वात मोठे फोकस सेक्टर ठरले आहेत. याशिवाय, ग्रामीण विकास (१२ लाख), समाज कल्याण (५ लाख), आरोग्य (४ लाख), आणि उद्योग (२.५ लाख) यांवरही मोठ्या प्रमाणात सूचना मिळाल्या आहेत.
मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्या 'समर्थ उत्तर प्रदेश-विकसित उत्तर प्रदेश @२०४७' अभियानानुसार, प्राप्त झालेल्या या ६० लाख सूचनांच्या आधारावर आता व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.