पोलिसवालाच निघाला रेकॉर्डवरील गुन्हेगार, १९ वर्षांपासून बिनबोभाटपणे करत होता नोकरी, असं फुटलं बिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 10:29 IST2023-12-13T10:28:09+5:302023-12-13T10:29:47+5:30
Uttar Pradesh Police News: उत्तर प्रदेशमधील देवरिया येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एक रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होमगार्ड बनून पोलिसांच्या डायल ११२ गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता.

पोलिसवालाच निघाला रेकॉर्डवरील गुन्हेगार, १९ वर्षांपासून बिनबोभाटपणे करत होता नोकरी, असं फुटलं बिंग
उत्तर प्रदेशमधील देवरिया येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एक रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होमगार्ड बनून पोलिसांच्या डायल ११२ गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. चौकशीमधून जेव्हा त्याचे बिंग फुटले तेव्हा पोलीस विभागामध्ये खळबळ उडाली. एसपींनी या होमगार्डला डायल ११२ गाडीवरून तत्काळ हटवण्याचे आदेश दिले. सध्या सीओंकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.
देवरिया पोलिसांकडून सराईतांवर नजर ठेवण्यासाठी चालण्यात येत असलेल्या अभियानामध्येच एक होमगार्ड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. या होमगार्डवर गँगस्टर, अपहरणासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या होमगार्डचं नाव कमलेश यादव असं आहे. तो गेल्या १९ वर्षांपासून उत्तर प्रदेश पोलीस दलामध्ये नोकरी करत आहे. मात्र त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत विभागाला कुठलीही माहिती नव्हती.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती एसपी संकल्प शर्मा यांना समजताच त्यांनी या सराईत आरोपी होमगार्डला पोलीस विभागातून हटवले. तसेच त्याच्याविरोधात चौकशीचे आदेश देत जिल्हा कमांडेंटना पत्र लिहिले. सलेमपूरच्या सीओंना या प्रकरणाचा विस्तृत पास करून लवकरात लवकर अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कमलेश यादव हा अनेक वर्षांपासून पोलीस विभागात नोकरी करत आहे. मात्र त्याच्याबाबतची सत्य परिस्थिती कुणालाच कळली नाही. मात्र हल्लीच देवरियामधील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सर्व सराईत गुन्हेगारांची प्रत्यक्ष पडाताळळणी करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी अशा गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातून कमलेश यादव याची सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली.