Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 16:45 IST2025-12-08T16:42:56+5:302025-12-08T16:45:02+5:30
Uttar Pradesh Kanpur Murder: उत्तर प्रदेशातील कानपूरच्या गुजैनी पोलीस ठाण्याच्या परिसरात मैत्रीला काळिमा फासणारी घटना घडली.

Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!
उत्तर प्रदेशातील कानपूरच्या गुजैनी पोलीस ठाण्याच्या परिसरात मैत्रीला काळिमा फासणारी घटना घडली. आपल्या ३२ वर्षीय मित्राच्या २० लाख रुपयांच्या एफडीवर डल्ला मारण्यासाठी, तीन मित्रांनी त्याची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले. हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी त्याचा चेहरा पोत्याने झाकला आणि त्यावर दगड ठेवून पांडू नदीच्या काठावर फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
विपिन तिवारी उर्फ गुड्डू असे मृत व्यक्तीचे आहे. तर, मनोज दीक्षित उर्फ लखन, अरविंद चंदेल आणि प्रदीप साहू अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विपिनचे वडील गंगा प्रसाद तिवारी यांना डिफेन्स कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत सुमारे २.४० कोटी रुपयांची भरपाई मिळाली. त्यातील २० लाख रुपये त्यांनी विपिनच्या नावे एफडी म्हणून ठेवले होते. आर्थिक अडचणींशी झुंजत असलेल्या या तिघांना विपिनच्या एफडीची माहिती मिळाली आणि त्यांनी हे पैसे हडपण्याचा कट रचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ डिसेंबरच्या रात्री तिघांनी विपिनला बोलावले आणि बारा देवी मंदिर चौकात नेले. तिथे त्यांनी विपिनला दारू पाजली. विपिन दारूच्या नशेत असताना, आरोपींनी त्याचा यूपीआय पिन मिळवला आणि त्याच्या खात्यातून ६००० ट्रान्सफर केले. पण आरोपींना विपिनच्या खात्यातून एफडीचे पैसे काढता आले नाहीत. विपिन शुद्धीवर आल्यानंतर त्याने विरोध करायला सुरुवात केली. आरोपींनी त्याला रिक्षाने निर्जनस्थळी नेले आणि त्याचा गळा आवळला. नंतर दगडाने त्याला ठेचले. मग दोन्ही हात दोरीने बांधून त्याला नदीत फेकले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी कबूल केले की, हत्येच्या वेळी ते दारूच्या नशेत होते. मृत विपिन आपल्या जीवाची याचना करत रडत राहिला, विनवणी करत राहिला, पण मित्रांनी त्याचे ऐकले नाही आणि त्याला संपवले. हत्येनंतर दुसऱ्या दिवशी, ३ डिसेंबर रोजी सकाळी फिरायला गेलेल्या लोकांनी नदीच्या काठावर मृतदेह पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी विपिनच्या शेवटच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली. त्याचा शेवटचा कॉल आरोपी मनोज दीक्षितच्या नंबरवर होता. सीसीटीव्ही फुटेज आणि लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. कठोर चौकशीनंतर तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.