जातीवाचक अन् धर्मसूचक शब्द असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 19:45 IST2023-08-22T19:25:37+5:302023-08-22T19:45:44+5:30
अलीगढच्या तस्वीर महल चौकात वाहतूक पोलिसांनी जातीवादक आणि धर्मावाचक शब्द असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली

जातीवाचक अन् धर्मसूचक शब्द असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई
लखनौ - ट्रॅफिक पोलिसांकडून अनेक कारणांसाठी वाहनचालकांना अडवलं जातं. परवाना असेल, हेल्मेट असेल, हटके नंबरप्लेट असेल किंवा आणखी काही असेल तर वाहनचालकांचे चालानही कापले जाते. त्यामुळे, वाहतूक पोलिसांना पाहून वाहनधारक आपली गाडी चालवताना काळजी घेत असतात. या घटनांवरुन अनेकदा वाहनधारक आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाल्याचं पाहायला मिळतं. त्यातच, आता अलिगढ पोलिसांनी जातीवाचक किंवा धर्मवाचक मजकूर लिहिल्याने वाहनधारकांवर कारवाई केली आहे.
अलीगढच्या तस्वीर महल चौकात वाहतूक पोलिसांनी जातीवादक आणि धर्मावाचक शब्द असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार संपूर्ण उत्तर प्रदेशात ही कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, अलिगढ पोलिसांकडून अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. वाहनांवर जातीवाचक किंवा धर्माचं प्रबोधन करणारे शब्द लिहिण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच यासंदर्भात कडक निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे, परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांची शोधमोहिम सुरू केली असून त्यासाठीचे अभियान राबविण्यात येत आहे. तसेच, अशा वाहनधारकांवर कारवाई करत पावती फाडली जात आहे. त्यामुळे, अलिगढ पोलिसांनी डझनभर वाहनांवर अशी कारवाई केली.
वाहतूक पोलीस अधिकारी कमलेश कुमार सिंह यांनी सांगितले की, शासनाकडून आलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. तस्वीर महल चौकात उभारुन पोलिसांकडून जातीवाचक व धर्मसूचक शब्द लिहिले आहेत, आणि चारचाकी वाहनाला काळी काच असल्यास ही कारवाई होत आहे.