अधुरी एक कहाणी! प्रियकराच्या लग्नात बेभान होऊन नाचली, मग चिठ्ठी लिहून संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 18:41 IST2024-02-27T18:40:11+5:302024-02-27T18:41:21+5:30
प्रेयसीने लग्नात डान्स करून मग टोकाचे पाऊल उचलले.

अधुरी एक कहाणी! प्रियकराच्या लग्नात बेभान होऊन नाचली, मग चिठ्ठी लिहून संपवलं जीवन
आपल्या डोळ्यादेखत प्रियकराचे होत असलेले लग्न पाहून संतापलेल्या तरूणीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष बाब म्हणजे संबंधित प्रेयसीने लग्नात डान्स करून मग टोकाचे पाऊल उचलले. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही घटना घडली. सोमवारी प्रियकराच्या लग्नात प्रेयसीने जोरदार डान्स केला. यानंतर मंगळवारी तिचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी खोलीतून दोन पानी सुसाईड नोट जप्त केली आहे. यासोबतच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
कानपूर येथील साढ या गावातील शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली. राम नारायण यादव हे शेतकरी आहेत, त्यांची मुलगी संगीता महानगरपालिकेत कंत्राटी संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत होती. ती तेथील जवळील कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरपूरम येथे भाड्याने राहत होती. ६ महिन्यांपासून ती इथे वास्तव्यास होती. मृत संगीता ज्या घरात राहायची त्या घराच्या मालकाने सांगितले की, संगीताने स्वतःला विवाहित असल्याचे सांगितले, तिच्यासोबत एक तरुणही राहत होता. तरुणाने स्वत:ला संगीताचा नवरा असल्याचे सांगितले.
चिठ्ठी लिहून संपवलं जीवन
मृत संगीताचा भाऊ अमित यादवने सांगितले की, संगीताचे विकास भवनातील कंत्राटी संगणक परिचालकासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचे होते, पण तिच्या प्रियकराचे लग्न दुसरीकडेच ठरले होते, त्याचे लग्न सोमवारी झाले. या तरुणाने संगीताला लग्नाचे निमंत्रणही दिले होते. संगीताने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, आई आणि बाबा, मला माफ करा... मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. खोलीत जे काही ठेवले आहे ते घ्या.