'परदेशी वस्तूंची खरेदी टाळा, विदेशी मॉडेल भारतासाठी धोकादायक', योगी आदित्यनाथ यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 09:39 IST2025-09-25T09:36:28+5:302025-09-25T09:39:19+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी 'आत्मनिर्भर भारत स्वदेशी संकल्प' या राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते.

'परदेशी वस्तूंची खरेदी टाळा, विदेशी मॉडेल भारतासाठी धोकादायक', योगी आदित्यनाथ यांचे आवाहन
लखनऊ : परदेशी वस्तूंची खरेदी करणे टाळा. देशातील पैसा भारतीय कारांगिरांच्या हातात गेला पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी स्वदेशीचा नारा दिला. 'दिवाळीपूर्वी म्हणजेच १० ते १८ ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा, एक उत्पादन (ODOP) आणि अन्य स्थानिक उत्पादनांचा एक आठवडाभर मेळावे आयोजित करा. त्यासाठी एमएसएमई विभाग या कार्यक्रमासाठी सहकार्य करेल', असे आवाहन मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी 'आत्मनिर्भर भारत स्वदेशी संकल्प' या राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते.
उद्योजकांना मोठा लाभ; विदेशी उत्पादने टाळा
मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, "हे मेळावे स्थानिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरतील. यामुळे लोक परदेशी वस्तू खरेदी करण्यापासून परावृत्त होतील. २०१७ पूर्वी बाजारात चिनी झालर मोठ्या प्रमाणात होती, पण आता लोक मातीचे दिवे वापरत आहेत."
"२०१७ मध्ये दीपोत्सवासाठी ५१ हजार पणत्या आयोध्येत मिळू शकल्या नव्हत्या. संपूर्ण राज्यातून त्या गोळा कराव्या लागल्या. मात्र, गेल्या वर्षी प्रज्वलित केलेले सर्व दिवे अयोध्येतच बनले होते. यावर्षीही दीपोत्सवात विक्रमी संख्येने दिवे प्रज्वलित होतील, जे माती आणि गाईच्या शेणापासून बनवलेले असतील," असे त्यांनी सांगितले.
यूपी इंटरनॅशनल ट्रेड शो म्हणजे स्वदेशीचा सर्वोत्तम मॉडेल
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रेटर नोएडा येथे २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या उत्तर प्रदेश इंटरनॅशनल ट्रेड शो (UPITS) चा उल्लेख केला. २५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, "UPITS हे स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचे सर्वोत्तम मॉडेल आहे. गेल्या वर्षी या शोमध्ये २२०० कोटी रुपयांची विक्री झाली होती, ज्यामुळे राज्यातील कारागीर आणि उद्योजकांना मोठे व्यासपीठ मिळाले होते."
ओडीओपी योजनेतून २ लाख कोटींची निर्यात
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'एक जिल्हा, एक उत्पादन' (ODOP) योजनेला देशातील सर्वात यशस्वी योजना मानले. ओडीओपीमुळे राज्यात ९६ लाख युनिट्स स्थापित झाले असून, दोन लाख कोटी रुपयांची निर्यात केली जात आहे. या योजनेतून सुमारे दोन कोटी लोकांना रोजगार मिळत आहे, असेही ते म्हणाले.
देशाचा पैसा देशातच राहावा
पंतप्रधान मोदी यांच्या 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' संकल्पनेवर भर देत मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले की, प्रत्येक भारतीयाने स्वदेशी उत्पादने खरेदी केली पाहिजेत. जो पैसा भारतात खर्च होतो, तो भारतीय कारागीर, हस्तशिल्पकार आणि तरुणांच्या हाती जातो. याउलट, विदेशी उत्पादने खरेदी केल्यास त्या देशाचा नफा भारतात आतंकवाद, नक्षलवाद आणि उग्रवाद भडकवण्यासाठी वापरला जाऊ शकतो," असे मत त्यांनी व्यक्त केले.
'परदेशी मॉडेल धोकादायक'
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी परदेशी विकासाच्या मॉडेल्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला. काही राज्यांमध्ये भूजल पातळी घटली आहे आणि दुष्काळाची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
"जेव्हा आपण विदेशी मॉडेल स्वीकारतो, तेव्हा ते धोकादायक ठरते. आपल्याला स्वदेशी मॉडेल स्वीकारण्याची गरज आहे. २०२४७ पर्यंत भारत विकसित होईल, आणि त्याचा मार्ग स्वदेशी व आत्मनिर्भर संकल्प अभियानातूनच जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.