मुलगी बघायला निघालेलं कुटुंब, भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 14:20 IST2024-03-10T14:19:03+5:302024-03-10T14:20:26+5:30
जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे समजते.

मुलगी बघायला निघालेलं कुटुंब, भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
जौनपूर - उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथे कार आणि ट्रकच्या भीषण अपघाताची घटना घडली. येथील प्रसाद इंजिनिअरींग महाविद्यालयाजवळ झालेल्या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहित मिळताच स्थानिक पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच, अपघातातील मृतांचे शव रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तर, जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे समजते.
बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील कुटुंब एर्टींगा कारमधून प्रयागराजला जात होते. जौनपूरच्या गौरदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसाद इंस्टीट्यूटजवळ कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये, एर्टींगा कारमधील एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना वाराणसी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, कारमधील कुटुंब मुलासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असल्याने प्रयागराजला निघाले होते. मात्र, वाटेतच ही भीषण दुर्घटना घडली. त्यामध्ये, अनिश गजाधर शर्मा, गजाधर लक्ष्मण शर्मा, जवाहर रामप्रताप शर्मा, गौतम जवाहर शर्मा, सोनम बजरंग शर्मा, रिंकू पवन शर्मा यांचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती देताना केराकतच्या मुख्याधिकारी यांनी सांगितले की, अपघातग्रस्त कार आणि ट्रक ताब्यात घेण्यात आला असून अपघाताची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. ट्रक चालक आणि इतर दोघे फरार झाले आहेत. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र, पोलिसांकडून ट्रक चालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.