"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:30 IST2025-09-06T10:29:57+5:302025-09-06T10:30:44+5:30
गोरखपूरमध्ये जनता दर्शन कार्यक्रमात ऐकल्या २०० नागरिकांच्या तक्रारी, तातडीने समस्या सोडवण्याचे दिले अधिकाऱ्यांना आदेश

"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
गोरखपूर : गोरखपूर दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्या दिवशी गोरखनाथ मंदिरात आयोजित जनता दर्शन कार्यक्रमात लोकांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी जवळपास २०० नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी लोकांना आश्वस्त करताना सांगितले, “घाबरू नका, सरकार आपल्या प्रत्येक समस्येचे निराकरण करेल. प्रभावी उपाययोजना केल्या जातील. शासन सर्वांच्या समस्यांवर संवेदनशीलतेने काम करण्यास कटिबद्ध आहे.”
महिलांची उपस्थिती उल्लेखनीय
मुख्यमंत्री स्वतःहून जनता दर्शन कार्यक्रमात आलेल्या बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे गेले आणि त्यांच्या अडचणी शांतपणे ऐकल्या. या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती जास्त होती ही बाब उल्लेखनीय आहे. योगी यांनी प्राप्त झालेले अर्ज अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून त्यांना निर्देश दिले की प्रत्येक प्रकरणाचे त्वरित, गुणवत्तापूर्ण व समाधानकारक निवारण करावे.
जमीन कब्जा तक्रारीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचेही योगींनी आदेश दिले. जर एखाद्या प्रकरणात पीडिताला वारंवार त्रास सहन करावा लागला असेल, तर त्याची चौकशी करून जबाबदारी ठरवण्याचे त्यांनी सांगितले.
आजारांवर उपचारांसाठी मदत
जनता दर्शनात अनेक जण गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी घेऊन आले होते. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, उपचारासाठी पैशांची कमतरता अडथळा ठरणार नाही. शासनातून पूर्ण मदत उपलब्ध करून दिली जाईल. रुग्णालयाच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाची प्रक्रिया लवकर पूर्ण करून शासनाकडे पाठवण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच, मुख्यमंत्री विवेकाधीन निधीतून आवश्यक निधी देण्याची हमी दिली आणि प्रत्येक पात्र व्यक्तीचे आयुष्मान कार्ड तयार करून देण्याच्या सूचना केल्या, जेणेकरून उपचारासाठी कुणालाही कसलीही अडचण येणार नाही.
या सर्व बाबींमधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले की लोकांच्या समस्यांवर संवेदनशीलतेने लक्ष देऊन त्यांचे तातडीने निवारण करणे हीच प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.