Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:31 IST2025-12-25T19:29:38+5:302025-12-25T19:31:38+5:30
उत्तर प्रदेशातील कासगंजच्या हकीमगंज गावात धक्कादायक घटना घडली.

AI Image
उत्तर प्रदेशातील कासगंजच्या हकीमगंज गावात धक्कादायक घटना घडली. आईच्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलाने स्वतःच्याच आईची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने लाकडी दांड्याने डोक्यावर प्रहार करून आईचा जीव घेतला. ही घटना २३ डिसेंबर रोजी घडली
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील रहिवासी सत्यपाल हे पंजाबमध्ये एका वीटभट्टीवर चौकीदार म्हणून काम करतात. त्यांची पत्नी रेखा ही काही दिवसांपूर्वीच पंजाबवरून गावी परतली. २३ डिसेंबरच्या रात्री रेखा तिच्या घरात प्रियकर भुरासोबत मद्यपान करत होती. त्याचवेळी तिच्या मुलाने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले. हे दृश्य पाहताच मुलाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागाच्या भरात मुलाने जवळच पडलेला लाकडी दांडा उचलला आणि भुरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुरा तिथून जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर मुलाने तोच राग आपल्या आईवर काढला. त्याने लाकडी दांड्याने आईच्या डोक्यावर प्रहार केले. रेखा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली, पण संतापलेला मुलगा बराच वेळ तिच्या बाजूलाच बसून राहिला आणि शेवटी तिथेच झोपला. रात्रभर अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे रेखाचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी उठल्यावर मुलाने स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी हत्येचा आरोप आईच्या प्रियकर भुरावर केला. पोलिसांनी सुरुवातीला संशयावरून भुराला ताब्यात घेतले. मात्र, चौकशीदरम्यान भुराने रात्री घडलेला सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी जेव्हा मुलाला ताब्यात घेऊन त्याची कसून विचारपूस केली असता तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला.
अप्पर पोलीस अधीक्षक सुशील कुमार यांनी सांगितले की, "अल्पवयीन मुलाने आईला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यामुळे चिडून हे कृत्य केले. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे."