Hathras Stampede : योगी आदित्यनाथांनी दिला हाथरस चेंगराचेंगरीचा ग्राउंड रिपोर्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:47 IST2024-07-03T15:46:37+5:302024-07-03T15:47:40+5:30
Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी २ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली आहे.

Hathras Stampede : योगी आदित्यनाथांनी दिला हाथरस चेंगराचेंगरीचा ग्राउंड रिपोर्ट!
हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी २ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी भोले बाबांच्या सत्संगाला अनेक राज्यांतून महिला आणि पुरुषांनी हजेरी लावली होती. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात लहान मुलांसह १२१ जणांना जीव गमवावा लागला.
या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली आहे. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला कठोर शिक्षा केली जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. या दुर्दैवी घटनेचे मुख्य कारण स्पष्ट करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भोले बाबांच्या सत्संगात त्यांना स्पर्श करण्याच्या शर्यतीत भक्तांमध्ये चेंगराचेंगरी झाली.
कथावाचक मंचावरून खाली उतरत असताना महिलांचा एक गट त्यांना हात लावण्यासाठी पुढे गेला आणि त्याचवेळी ही घटना घडली. घटनास्थळी सेवा कर्मचारीही उपस्थित होते, त्यांच्याशी बाचाबाची झाली. मात्र, या घटनेतील व्यक्तींचा मृत्यू होण्यापूर्वीच सेवा कर्मचारीही तेथून निघून गेले, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
याचबरोबर, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकार मृत्युमुखी पडलेल्यांना ४ लाख रुपये आणि गंभीर जखमींना १ लाख रुपयांची मदत करणार आहे. तसेच, यापेक्षा मोठे कार्यक्रम आम्ही आयोजित केले असून अशी घटना घडली नाही, असे सांगत आम्ही कुंभसारख्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
३ मंत्री कालपासून तिथे तळ ठोकून आहेत - योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, "मी घटनास्थळी भेट दिली आणि अपघाताच्या कारणांची प्राथमिक व्यवस्था पाहिली आणि आमचे ३ मंत्री कालपासून तिथे तळ ठोकून आहेत. मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक देखील उपस्थित आहेत. कालच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासन अधिकारी तिथे उपस्थित असून या संपूर्ण घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून प्राथमिक तपासानंतर पुढील कारवाई करू."