टोमॅटो दरवाढीचा असाही निषेध; गळ्यात माळ घालून आमदार विधानपरिषदेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 14:16 IST2023-08-07T14:14:38+5:302023-08-07T14:16:17+5:30
युपी विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यासाठी सत्ताधारी पक्ष विविध मुद्द्यांवर उत्तर देण्यासाठी तयारी करत आहे.

टोमॅटो दरवाढीचा असाही निषेध; गळ्यात माळ घालून आमदार विधानपरिषदेत
टोमॅटोने गेल्या महिनाभरापासून चांगलाच भाव खाल्लाय. त्यामुळे, अनेकांच्या भाजीतील टोमॅटो गायब झाला आहे. टॉमॅटोला १ किलोसाठी तब्बल २०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत आहे. त्यामुळेच, वाढत्या दरवाढीवरुन सर्वसामान्य माणूस सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. तर, नेतेमंडळी राजकीय मुद्दा बनवत विषय उचलून धरत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये एका भाजीविक्रेत्याने टोमॅटोच्या संरक्षणासाठी चक्क बाऊंसर उभे केल्याचं पाहायला मिळालं. आता, युपी विधानसभेच्या अधिवेशन काळात समाजवादी पक्षाच्या नेत्याने टोमॅटोची माळ गळ्यात घालून विधिमंडळात प्रवेश केला.
युपी विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यासाठी सत्ताधारी पक्ष विविध मुद्द्यांवर उत्तर देण्यासाठी तयारी करत आहे. तर, सरकारला घेरण्यासाठी विरोधकही आपली रणनिती ठरवत आहेत. दरम्यान, पहिल्याच दिवशी समाजवादी पक्षाचे विधानपरिषद सदस्य आशुतोष सिन्हा यांनी चक्क टोमॅटोची माळ गळ्यात घालून विधिमंडळ पसिरात सायकलवरुन प्रवेश केला. टोमॅटोच्या वाढत्या दरवाढीवरुन त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारला लक्ष्य केलं.
महागाई सातत्याने वाढत असून सर्वसामान्य माणसांना घर चालवणं कठीण बनलं आहे. आजमित्तीस खुदरा बाजारात टोमॅटोचे भाव २०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. सपा कार्यकर्त्यांकडून विधानभवन परिसरात चौधरी चरणसिंह यांच्या प्रतिमेजवळ याविरुद्ध आंदोलन करत आहेत.
दरम्यान, देशभरात टोमॅटोने चांगलाच भाव खाल्ला आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत आहे. अनेक शेतकरी लखपती, तर काही करोडपतीही बनले आहेत. मात्र, या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून शासनाचे लक्ष याकडे वेधण्यासाठी नागरिक विविध मार्गाने आंदोलन करताना दिसून येतात.