वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:53 IST2026-01-14T11:52:45+5:302026-01-14T11:53:23+5:30
Indian Railway Ticket Fare Increase News: शताब्दी, तेजस, वंदे भारत आणि गतिमान या सर्व ट्रेन चेअर कार स्वरुपातील आहे.

वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
Indian Railway Ticket Fare Increase News: भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, सुविधांसाठी आणि सुरक्षिततेसाठी अनेक प्रकारचे बदल करत असते. काही बदलांचे प्रवाशांकडून स्वागत केले जाते. तर काही बदलांमुळे प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत असतात. डिसेंबर २०२५ मध्ये भारतीय रेल्वेने तिकीट दरांमध्ये वाढ केली. यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. यातच भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि गतिमान एक्स्प्रेस या प्रिमियम ट्रेन आहेत. रेल्वेने तिकीट दरात वाढ केल्यानंतर यापैकी कोणत्या ट्रेनचे तिकीट तुलनेने स्वस्त आहे, ते जाणून घेऊया...
प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळावा यासाठी भारतीय रेल्वे देशभरात विविध ट्रेन चालवते. मेल, एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि प्रीमियम ट्रेनचा यात समावेश आहे. सध्या, प्रीमियम श्रेणीमध्ये राजधानी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस आणि वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे. २६ डिसेंबर २०२५ पासून भारतीय रेल्वेने सुधारित भाडे रचना लागू केली आहे. यानुसार, नॉन-एसी कोचमध्ये ५०० किमीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १० रुपये जास्त द्यावे लागतील. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये नॉन-एसी कोचसाठी प्रति किलोमीटर २ पैसे भाडे वाढवले आहे, तर एसी क्लासच्या भाड्यातही प्रति किलोमीटर २ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
शताब्दी, तेजस, वंदे भारत आणि गतिमान या सर्व ट्रेन चेअर कार स्वरुपातील आहे. यामध्ये एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास येतात. अलीकडच्या दर वाढीनंतर एसी चेअर कारमध्ये १-५० किमी प्रवासासाठी मूळ तिकिटाची किंमत शताब्दी एक्सप्रेससाठी ₹१७४, तेजस एक्सप्रेससाठी ₹२०८, वंदे भारतसाठी ₹२४३ आणि गतिमान एक्सप्रेससाठी ₹२५१ आहे.
एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये त्याच अंतरासाठी शताब्दीवर ₹३८८, तेजसवर ₹४६५, वंदे भारतवर ₹५०४ आणि गतिमानवर ₹५६२ हे मूळ भाडे आहे. या चार ट्रेनपैकी, शताब्दी एक्सप्रेसचे तिकीट सर्वात स्वस्त आहे. तथापि, आराम आणि सुविधांच्या बाबतीत, वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणे श्रेयस्कर आहे.