Palitana Town: 'हे' आहे भारतातील एकमेव शाकाहरी शहर, फारच रंजक आहे यामागची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 20:05 IST2022-02-17T19:52:28+5:302022-02-17T20:05:28+5:30
जैन धर्मियांचे हे खास पवित्र स्थान असून हे शहर शुध्द खाणे आणि फिरण्यासाठी मस्त मानले जाते. या शहरात प्राणीहत्या करण्यास बंदी आहे तसेच येथे अंडी, मांस विक्रीला सुद्धा बंदी आहे.

Palitana Town: 'हे' आहे भारतातील एकमेव शाकाहरी शहर, फारच रंजक आहे यामागची गोष्ट
जगात कुठेही गेलात तरी पूर्ण शाकाहार घेणारे नागरिक राहत असतील असे शहर सापडणे अवघड आहे पण भारतात मात्र असे एक शहर आहे जेथे पूर्ण शाकाहार चालतो. गुजराथच्या भावनगर जिल्यात असलेल्या या छोट्या शहराचे नाव आहे पालीताना. जैन धर्मियांचे हे खास पवित्र स्थान असून हे शहर शुध्द खाणे आणि फिरण्यासाठी मस्त मानले जाते. या शहरात प्राणीहत्या करण्यास बंदी आहे तसेच येथे अंडी, मांस विक्रीला सुद्धा बंदी आहे.
अर्थात पूर्वीपासून अशी बंदी नव्हती. पण येथील सुमारे २०० जैन भिक्षुनी शहरातील २५० कसाई दुकाने बंद व्हावीत आणि शहरात प्राणीहत्या केली जाऊ नये, तसेच मांसाहार केला जाऊ नये यासाठी २०१४ मध्ये उपोषण सुरु केले. हे उपोषण इतके लांबले कि शेवटी सरकारने माघार घेतली. तेव्हापासून या शहरात एकही प्राणी मारला गेला नाही शिवाय कसायांची दुकाने बंद केली गेली आणि शहरात मांसाहार करण्यास प्रतिबंध केला गेला. सरकारने हे शहर मांसमुक्ती क्षेत्र जाहीर केले आहे.
अर्थात या शहरात डेअरी उत्पादनांना परवानगी आहे. या शहरात अनेक जैन मंदिरे असून जैनांचे हे मुख्य तीर्थस्थळ मानले जाते. हा पहाडी भाग असून येथील एका डोंगरावर शहराचे रक्षक आणि महावीरांचा अवतार आदिनाथ गेले होते तेव्हापासून ती जागा जैन अनुयायींसाठी महत्वपूर्ण बनली आहे. या एका शहरात सुमारे ९०० मंदिरे आहेत आणि जगातील हा सर्वात मोठा मंदिर परिसर मानला जातो.
या शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. शतसंजया हिल, श्री विशाल जैन म्युझियम, हस्तगिरी जैन तीर्थ, गोपनाथ बीच, तळजा अशी त्यांची नावे आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी बस, रेल्वे आणि विमान सेवा आहे.