पावसाळ्यात ताजमहाल पाहण्याची असते वेगळी मज्जा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 15:52 IST2019-08-02T15:46:52+5:302019-08-02T15:52:02+5:30
जर संपूर्ण भारत फिरण्याच्या विचारात असाल तर मग सर्वात आधी ताजमहाल फिरण्याचा प्लॅन करा. कारण भारताची शान असलेला ताजमहाल जोपर्यंत तुम्ही फिरत नाही, तोपर्यंत तुमची भारत भ्रमंती पूर्ण होणार नाही.

पावसाळ्यात ताजमहाल पाहण्याची असते वेगळी मज्जा!
जर संपूर्ण भारत फिरण्याच्या विचारात असाल तर मग सर्वात आधी ताजमहाल फिरण्याचा प्लॅन करा. कारण भारताची शान असलेला ताजमहाल जोपर्यंत तुम्ही फिरत नाही, तोपर्यंत तुमची भारत भ्रमंती पूर्ण होणार नाही. उत्तर प्रदेशमधील आगरा शहरात असलेल्या या ताजमहालाच्या सौंदर्याच्या संपूर्ण जगभरात चर्चा असतात. प्रेमाची निशाणी असलेला हा ताजमहाल आपल्या अद्भूत सौंदर्याने अनेकांना आपल्या प्रेमात पडायला भाग पाडतो. एवढंच नाहीतर दुबईमध्ये चक्क ताजमहालाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
तुम्ही भारतात राहत असाल किंवा परदेशात, पण आयुष्यात एकदातरी ताजमहाल नक्की पाहा. जर तुम्ही ताजमहाल पाहण्याचा विचार करत असाल, तर संपूर्ण प्लॅन करूनच जा. यासाठी कोणत्या वातावरणात? कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी येथे भेट देणं उत्तम राहिल, याचा संपूर्ण प्लॅन करा.
थंडीमध्ये ताजमहाल पाहायला जाणं टाळा. कारण येथे धुकं असल्यामुळे याचं सौंदर्य तुम्हाला न्याहाळता येणार नाही. याव्यतिरिक्त उन्हाळ्यातही ताजमहाल पाहायला जाणं अत्यंत त्रासदायक ठरू शकतं. आगरामध्ये एप्रिल ते जून दरम्यान तापमान 40 अंश सेल्सिअस असतं. अशातच तुम्हाला हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशन होऊ शकतं.
मान्सूनमध्ये तुम्ही ताजमहाल फिरण्याचा प्लॅन करू शकता. पावसाळ्यात तुम्हाला ताजमहाल कोणत्याही अडथळ्या व्यतिरिक्त पाहता येईल. तसेच यामुळे तुम्हाला ताजमहालाची खरी चमक अनुभवता येईल.
पावसाळ्यामध्ये ताजमहाल पाहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, येथे तुम्हाला गर्दी अजिबात भेटणार नाही. मान्सूनमध्ये ट्रिप प्लॅन करणार असाल तर स्वतःसोबत रेनकोट किंवा छत्री ठेवायला विसरू नका. ताजमहालाच्या मागच्या बाजूने यमुना नदी वाहते. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही एका सुंदर दृश्याचे साक्षीदार होऊ शकता.
लक्षात ठेवा :
ताजमहाल शुक्रवारी बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे ट्रिप प्लॅन करताना शुक्रवारी न जाता इतर दिवशी प्लॅन करा.
पौर्णिमेच्या दिवशी ताजमहाल 8:30 ते 12:30 पर्यंत पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात येतो. तसेच पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर आणि नंतरही पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात येतो. इतर दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही येथे भेट देऊ शकता.