(Image Credit : Social Media)
भारतात अनेक अनोखे मंदिरे आहेत, जी त्यांच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत. असंच एक अनोखं मंदिर मध्य प्रदेशातील माणक येथे आहे. सामान्यपणे जवळपास सर्वच मंदिरांमध्ये भक्तांना प्रसाद म्हणून मिठाई किंवा काही खाण्याचे पदार्थ मिळतात. पण येथील महालक्ष्मीच्या मंदिराची खास बाब ही आहे की, इथे भक्तांना प्रसाद म्हणून दागिने मिळतात. इथे येणारे भाविक सोन्या-चांदीची नाणी घेऊन घरी जातात.
beingindian.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, महालक्ष्मीच्या या मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी बघायला मिळते आणि भाविक इथे येऊन कोट्यवधी रूपयांचे दागिने आणि रक्कम देवीला अर्पण करतात.
दिवाळीला या मंदिरात धनत्रयोदशीपासून पुढील पाच दिवस दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. यादरम्यान मंदिराला फुलांनी नाही तर भाविकांनी भेट म्हणून दिलेल्या दागिन्यांनी आणि पैशांनी सजवलं जातं. दिवाळीला मंदिरात कुबेराचा दरबार लावला जातो. यावेळी इथे येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून दागिने आणि पैसे दिले जातात.
दिवाळीच्या दिवशी या मंदिरातील कपाटं २४ तास उघडी असतात. असे म्हटले जाते की, धनत्रयोदशीला महिला भाविकांना इथे प्रसाद दिला जातो. इथे येणारा एकही भाविक येथून रिकाम्या हाताने परतत नाही. त्यांना काहीना काही प्रसाद मिळतोच.
मंदिरात दागिने आणि रूपये अर्पण करण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. आधी येथील राजा राज्याच्या समृद्धीसाठी मंदिरात धन देत होते आणि आता भाविकही इथे देवीच्या चरणी दागिने अर्पण करतात. इथे अशी मान्यता आहे की, असं करून त्यांच्या घरात लक्ष्मीची कृपा नेहमी राहते.