वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:44 IST2025-12-29T13:41:28+5:302025-12-29T13:44:57+5:30
Indian Railway Hydrogen Train Loco Pilot Salary: हायड्रोजन ट्रेनचे लोको पायलट होण्यासाठी काय करावे लागणार? दरमहा किती पगार मिळणार? जाणून घ्या...

वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
Indian Railway Hydrogen Train Loco Pilot Salary: आताच्या घडीला भारतीय रेल्वे पायाभूत सुविधा, रेल्वेचे जाळे, ट्रेनचे प्रकार, प्रवासी सुविधा यासंदर्भात अगदी वेगाने काम करत आहे. देशभरातील अनेक स्टेशनचा विकास केला जात आहे. राजधानी, शताब्दीनंतर आता वंदे भारत ट्रेनचे युग भारतीय रेल्वेत आले आहे. वंदे भारत ट्रेनच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर आता स्लीपर वंदे भारत ट्रेन आणली जाणार आहे. याहीपेक्षा एक पाऊल पुढे टाकत आता भारतीय रेल्वेने हायड्रोजन ट्रेन तयारी केली आहे.
भारतीय रेल्वेची यंत्रणा हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. हजारो ट्रेन दररोज सेवा देत असतात. या ट्रेनचे नियोजन हाच एक मोठा टास्क मानला जातो. लाखो लोक दररोज भारतीय रेल्वेच्या विविध सेवांचा लाभ घेत असतात. अगदी मुंबईतील लोकल ट्रेनपासून ते भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या वंदे भारत ट्रेनपर्यंत प्रवासी प्रवास करत असतात. वंदे भारत, राजधानी, शताब्दी, डबल डेकर, दुरंतो, हमसफर, जनशताब्दी, अंत्योदय अशा प्रिमियम ते सामान्य प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे सेवा देते. जगभरात भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल नेटवर्क मानले जाते. परंतु, या ट्रेन वेळेत हाकण्याचे अतिशय कौशल्याचे, जबाबदारीचे आणि नित्य नेमाचे काम लोको पायलट करत असतात.
भारतीय रेल्वेची हायड्रोजन ट्रेन कधीपर्यंत येणार?
भारतीय रेल्वेने हायड्रोजनवर चालणारी देशातील पहिली ट्रेन चालवण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. देशाची पहिली हायड्रोजन ट्रेन RDSO (रिसर्च, डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन) च्या मानकांनुसार संपूर्णतः स्वदेशी पद्धतीने तयार करण्यात आली आहे. हायड्रोजनवर चालणारी ही ट्रेन सर्वात शक्तिशाली आणि सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन असणार आहे. या ट्रेनमध्ये ८ ते १० प्रवासी कोच असणार आहेत. या ट्रेनचे एकमेव उत्सर्जन जलवाष्प असल्याने ती पूर्णपणे शून्य-कार्बन उत्सर्जन तंत्रज्ञानावर आधारित राहील. हायड्रोजन ट्रॅक्शन हे नेक्स्ट-जनरेशन फ्यूल तंत्रज्ञान असून, हा प्रकल्प भारतीय रेल्वेसाठी मोठा टप्पा ठरेल.
हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला होण्यासाठी काय करावे लागणार?
हायड्रोजन ट्रेन चालवता येण्यासाठी वेगळा, नवीन कोर्स करण्याची आवश्यकता नाही. हायड्रोजन ट्रेन ड्रायव्हर होण्यासाठी प्रथम भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट बनणे आवश्यक आहे. यासाठी नवीन प्रक्रिया नसून, आताचीच प्रक्रिया हायड्रोजन ट्रेनना लागू होईल, असे म्हटले जात आहे. रेल्वेमध्ये, उमेदवारांना प्रथम असिस्टंट लोको पायलट म्हणून नियुक्त केले जाते. यासाठी किमान ITI किंवा डिप्लोमा पात्रतेसह दहावीची पदवी आवश्यक आहे. यासह संबंधित क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेल्यांनाही प्राधान्य दिले जाते. जेव्हा हायड्रोजन ट्रेन्स नियमितपणे चालवल्या जातात, तेव्हा लोको पायलटना विशेष तांत्रिक आणि सुरक्षितता प्रशिक्षण दिले जाऊ शकते.
हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार?
भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलटचा सुरुवातीचा पगार साधारणपणे ₹३० हजार ते ₹४० हजार प्रति महिना असतो. यामध्ये मूळ पगार तसेच विविध भत्ते समाविष्ट असतात. अनुभवानुसार पगार वाढतो. अनुभवी लोको पायलट त्यांच्या ग्रेड आणि ते चालवत असलेल्या ट्रेनच्या प्रकारानुसार दरमहा ₹३५ हजार ते ₹१ लाखपर्यंत कमवू शकतात.
दरम्यान, जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनने रेल्वेसाठी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. अलिकडेच रेल्वेने या इंजिनची यशस्वी चाचणी केली. हे इंजिन चेन्नईतील कारखान्यात तयार करण्यात आले आहे. ही रेल्वे जगातील सर्वात शक्तिशाली असणार आहे. ही रेल्वे २६०० प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असणार आहे.