भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:17 IST2025-12-04T17:16:24+5:302025-12-04T17:17:30+5:30
भाईंदरमध्ये मराठी असल्याने फ्लॅट नाकारल्याचे म्हणत युवक काँग्रेसने बिल्डर लॉबीवर गंभीर आरोप केले आहेत.

भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
Bhayandar Builder: मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून मराठी विरुद्ध परप्रांतीय असा भाषिक आणि प्रादेशिक वाद धुमसत आहे. काही दिवसांपूर्वी परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर हा वाद अधिक चिघळला असतानाच, आता भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाईंदरच्या एका गृहनिर्माण प्रकल्पात मराठी असल्याने आपल्याला फ्लॅट नाकारण्यात आला, असा थेट आरोप एका तरुणाने केला. मराठी तरुणाला फ्लॅट नाकरण्यात आल्याने पुन्हा एकदा मोठा वाद उभा राहिला आहे.
भाईंदर पश्चिम येथील स्कायलाईन या गृहनिर्माण प्रकल्पात घर खरेदी करण्यासाठी गेलेल्या रवींद्र खरात या तरुणाने हा गंभीर आरोप केला आहे. खरात यांच्या म्हणण्यानुसार, ते फ्लॅटची माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, या प्रोजेक्टमध्ये केवळ जैन, मारवाडी किंवा ब्राह्मण समाजाच्या लोकांनाच फ्लॅट दिले जातात. रवींद्र खरात यांनी आपली व्यथा मांडताना म्हटले की, "आम्ही मराठी आहोत, नॉनव्हेज खातो आणि आमची जात ब्राह्मण, जैन किंवा मारवाडी नसेल, तर आम्हाला फ्लॅट दिला जाऊ शकत नाही, असे तिथे स्पष्टपणे सांगण्यात आले." अशा बिल्डरवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी खरात यांनी केली आहे.
युवक काँग्रेसचे 'स्टिंग ऑपरेशन'
या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष सिद्धेश प्रकाश राणे, प्रवक्ता रवी खरात आणि महासचिव किरण परुळेकर यांनी बालाजी भुतारा बिल्डर्सच्या स्कायलाईन प्रोजेक्टवर स्टिंग ऑपरेशन करून हे धक्कादायक वास्तव उघड केल्याचा दावा केला आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बिल्डरच्या प्रतिनिधींनी मराठी व्यक्तींना घर देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. "या पट्ट्यामध्ये ८५ टक्के गुजराती, मारवाडी लोक आहेत. कोणाशीही बोलून फायदा नाही. बिल्डरसुद्धा जैन आहे," असे गृहप्रकल्पाचा प्रतिनिधी बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
बिल्डर जैन समाजाचा आहे आणि तो केवळ जैन बांधवांसाठीच इमारती बांधणार आहे का? स्थानिक आमदार आणि बिल्डर लॉबीदेखील जैन असल्याने भाईंदरमध्ये मराठी माणसाला जाणूनबुजून डावलले जात आहे. महाराष्ट्रामध्येच मराठी माणसाच्या हक्काची आणि भाषेची गळचेपी सुरू आहे," असा संतप्त आरोप युवक काँग्रेसने केला आहे. मागील १० वर्षांत मराठी लोकांना घर नाकारणे, त्यांच्या आहारावर बंधने घालणे असे प्रकार वाढले असल्याचा दावाही त्यांनी केला.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला घर नाकारल्याचा हा मुद्दा उपस्थित झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाईंदर-मीरा रोड परिसरात मराठी माणसाची गळचेपी होत असल्याचा मुद्दा यापूर्वीही अनेकदा उपस्थित झाला आहे. काही महिन्यांपूर्वी एका दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यावर मनसेने मोठं आंदोलन देखील केले होते.