"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:34 IST2025-10-17T15:29:43+5:302025-10-17T15:34:14+5:30
Thane News: राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, सगळेच पक्ष स्व'बळ' दाखवू लागले आहेत. ठाण्यात तर महायुतीतीलच दोन मित्रपक्ष एकमेकांसमोर आले आहेत.

"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपचीही ताकद वाढली आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आव्हान देऊ लागले आहेत. हा सुप्त राजकीय संघर्ष स्थानिक पातळीवर वाढू लागला असून, कल्याणचे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले. तुम्ही सोबत आला, तर तुमच्यासह नाही, तुम्हाला आडवे करू, असे मोरे म्हणाले. त्यावर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पलटवार केला. भाजप जेव्हा जेव्हा स्वबळावर लढली तेव्हा तेव्हा शिवसेनेला आडवे केले, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला.
काही दिवसांपूर्वीच ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी स्वबळाचा नारा दिला होता. 'आम्ही गाफील नाही. ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे स्वबळावर लढवण्याची वेळ आली तरी आमची तयारी आहे. ठाण्यात भाजपचा महापौर होण्यासाठी पक्ष काम करेन. आम्ही आमचा महापौर बसेल हे सांगितले आहे", असे म्हटले होते.
ठाण्यातील इतर महापालिका क्षेत्रातही भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना यांच्यात ताकद दाखवणे सुरू झाले आहेत. त्यातच आता कल्याणडोंबिवलीचे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख यांनी भाजपलाच आडवे करण्याचा इशारा दिला.
अरविंद मोरे काय बोलले?
"युती होवो अथवा न होवो... आम्ही या ठिकाणी स्पष्ट सांगतोय. याल तर तुमच्यासह नाही आलात तर आडवे करू. या ठिकाणी शिवसेनेचे जे जे लोक असतील. त्या त्या लोकांना निवडून आणण्याचं काम हा जिल्हाप्रमुख चॅलेंज म्हणून तुम्हाला सांगतोय", असे आव्हान मोरेंनी भाजपला दिले.
नरेंद्र पवार म्हणाले, आम्ही शिवसेनेला आडवे केले
शिंदेंच्या शिवसेनेकडून आडवे करण्याची भाषा करण्यात आल्यानंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले, "अरविंद मोरेंचा बहुतेक अभ्यास कमी आहे. ज्या ज्या वेळी युती झाली, त्या त्या वेळी तुम्ही गद्दारी केल्यामुळे आमचे अनेक लोक धारातीर्थी पडले. त्याचा बळी मी स्वतः आहे. ज्या ज्या वेळी युती झाली नाही. भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढली. त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे भाजपला आडवे करण्याची भाषा अरविंद मोरेंनी करू नये अशी माझी विनंती आहे."
ठाणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक महापालिका आहेत. या सर्वच महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, महायुतीतील भाजप शिंदेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यात जास्त प्राबल्य आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील स्थानिक नेते एकमेकांविरोधात दंड थोपटताना दिसू लागले आहेत.