तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा, आम्ही विकासाचे मनोरे रचू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:10 IST2025-08-16T19:05:03+5:302025-08-16T19:10:00+5:30
कपिल पाटील फाउंडेशन संस्थेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी हजेरी लावली होती.

तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा, आम्ही विकासाचे मनोरे रचू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भिवंडी: शहराचे चित्र आता बदलले आहे, मध्ये अडीच वर्षाचा खंड पडला होता, परंतु आता चिंता करू नका पुन्हा एकदा भिवंडीचे चित्र बदलण्याचे काम आपले सरकार करणार असून भिवंडी शहराला आधुनिक शहर करण्याचा काम आम्ही करू. तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा, तुमच्यासोबत आम्ही विकासाचे मनोरे रचू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भिवंडीत व्यक्त केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कपिल पाटील फाउंडेशन संस्थेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी हजेरी लावली होती.
यावेळी सर्व गोविंदा पथकांना त्यांनी शुभेच्छा देत मनोरे रचतांना सुरक्षेचे काळजी देखील घ्या, तुम्ही देशाचे भविष्य आहात. आपला भविष्य सुरक्षित राहिला पाहिजे, असा सल्ला देखील फडणवीसांनी गोविंदांना दिला.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, मंत्री गणेश नाईक, आमदार महेश चौघुले, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, शहराध्यक्ष रवी सावंत, माजी नगरसेवक सुमित पाटील आदी भाजप पदाधिकारी व गोविंदा मोठ्या संख्येने उपास्थित होते.
मी जेव्हा जेव्हा भिवंडीत दहीहंडी साठी येतो तेव्हा वरुण राजाला सोबत घेऊन येतो, कारण माझे नाव देवेंद्र आहे. आज सर्वत्र पाऊस आहे मात्र पावसामध्ये इतका दम नाही की तो गोविंदाना थांबवू शकेल. आमच्या गोविंदांचा उत्साह हा श्री कृष्णाचा उत्साह आहे. त्यामुळे त्याला वरून राजा देखील थांबवू शकत नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली. आता मोदींच्या नेतृत्वात विकासाची हंडी उंच चालली आहे आणि विकासाचे मनोरे लावून हंडीतील लोणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा निर्धार मोदींनी केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले.