ज्वेलर्समधून दागिने लुबाडणाऱ्या सराईत महिला चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:17 AM2021-03-04T05:17:26+5:302021-03-04T05:17:26+5:30

ठाणे : ज्वेलर्सच्या पेढीतील विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून दागिने लुबाडणाऱ्या आयुषी शर्मा (२६) आणि संजू गुप्ता (३४) या दोन सराईत ...

Woman thief arrested for stealing jewelery from jewelers | ज्वेलर्समधून दागिने लुबाडणाऱ्या सराईत महिला चोरट्यांना अटक

ज्वेलर्समधून दागिने लुबाडणाऱ्या सराईत महिला चोरट्यांना अटक

Next

ठाणे : ज्वेलर्सच्या पेढीतील विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून दागिने लुबाडणाऱ्या आयुषी शर्मा (२६) आणि संजू गुप्ता (३४) या दोन सराईत महिला चोरट्यांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांनी अशाच प्रकारे दागिन्यांची लूट केली असून, त्यांच्याकडून चार लाख ९२ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

ठाण्याच्या नौपाड्यातील गोखले रोडवरील रिचेस ज्वेलर्स आर्केड या दागिन्यांच्या दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने २३ फेब्रुवारीला दोन महिला आल्या होत्या. काउंटरवरील विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून त्यांनी तीन लाख २७ हजारांच्या ६१.२५० ग्रॅमच्या सोन्याच्या दोन बांगड्या लंपास केल्या होत्या. याप्रकरणी २४ फेब्रुवारीला नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने दुकानातील सीसीटीव्हीतील चित्रण तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे आयुषी आणि संजू या दोघींना २६ फेब्रुवारीला मीरा रोड येथून अटक केली. या चोरीतील बांगड्यांव्यतिरिक्त त्यांच्याकडून मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक लाख ६५ हजारांच्या दोन सोन्याच्या बांगड्या असे चार लाख ९२ हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही कोल्हापूर येथे दोन, पुण्यात दोन तसेच मुंबईत एक असे पाच गुन्हे दाखल आहेत.

* टापटीप पोशाखात करत होत्या प्रवेश

एखाद्या नामांकित सराफाच्या दुकानात प्रभाव पडेल, अशा पोशाखामध्ये या दोघी शिरकाव करत असत. नंतर, दुकानातील विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून त्या दागिने लंपास करीत असल्याचे तपासात उघड झाल्याचे मांगले यांनी सांगितले.

------------------

Web Title: Woman thief arrested for stealing jewelery from jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.