will end Shiv Sena from Meera Bhayandar; Former MLA Narendra Mehta takes oath | मीरा भाईंदरमधून शिवसेनेला संपवून टाकणार; माजी आमदार नरेंद्र मेहतांनी घेतली शपथ
मीरा भाईंदरमधून शिवसेनेला संपवून टाकणार; माजी आमदार नरेंद्र मेहतांनी घेतली शपथ

मीरारोड - शिवसेना हा मोठा विश्वासघातकी पक्ष असून येणाऱ्या काळात मी आणि आमदार गीता जैन मिळून मीरा भाईंदरमधून शिवसेना मुळासकट संपवुन टाकणार असल्याचा दावा भाजपाचे पराभूत आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत उघडपणे गीता यांना साथ दिल्याने मेहतांच्या पराभवामागचे ते देखील एक महत्वाचे कारण मानले जाते. तर मेहतांनी गीता यांचे नाव घेत गीता यांची कोंडी करतानाच सेनेला देखील दम भरल्याचे मानले जाते.

मीरा भाईंदर महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाचे ६१ नगरसेवक निवडून आले असले तरी त्यातील निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक हे निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसेमधून आलेले होते. त्यामुळे अन्य पक्षातून आलेले आणि आपापल्या भागात आपलं वर्चस्व ठेऊन असलेल्यांमुळे तसेच चार जणांच्या पॅनलपध्दती मुळे भाजपाला मोठा फायदा झाला ही वस्तुस्थिती आहे.

पण भाजपाच्या हाती पूर्ण बहुमत मिळाल्यापासून मेहतांच्या हाती एकछत्री कारभार आला. मेहतांनी शिवसेनेसह काँग्रेसच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामांपासून प्रभाग समिती निधी आदी अनेक कारणांनी कोंडी केली. खुद्द शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी हाती घेतलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे कला दालन, घोडबंदर किल्ला सुशोभिकरण आदी अनेक कामांमध्येही हस्तक्षेप केला. पालिका निवडणुकीआधी तर परिवहन सेवा चालवण्याचा ठेका मिळालेल्या ठेकेदारास २५ लाखांची लाच देताना पकडून देणाऱ्या मेहतांनी त्यात सरनाईकांना देखील ओढण्याचा कसोशीने प्रयत्न केल्याची चर्चा झडली होती.

सरनाईकांच्या मतदार संघातील जुनी औद्योगिक वसाहत तोडण्यासाठी मेहतांनी पुढाकार घेतल्याने दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. त्यावेळी देखील सरनाईकांना पाडणार असा इशारा मेहतांनी दिला होता. महासभेतील विषयांवरून सुध्दा खडाजंगी चालली होती. गणपती विसर्जनावेळी जेसलपार्क शाखे जवळचा सेनेचा मंडप देखील मेहतांनी स्थानिक भाजपा नगरसेविकेच्या तक्रारीवरुन काढुन टाकायला लावला होता. सेनेच्या नगरसेविका अनिता पाटील यांना भाजपाने फोडले. त्यातच बाळासाहेबांच्या कला दालनाच्या कामास मंजुरी देण्यास मेहतांच्या इशाऱ्यावरून स्थायी समितीमध्ये भाजपा नगरसेवकांनी सतत टाळटाळ केल्याने काही सेना नगरसेवक - पदाधिकारायांनी स्थायी समिती सभागृह, महापौर दालनात तोडफोड केली होती.

त्या तोडफोडी वरुन पालिका सचीवांनी भार्इंदर पोलीस ठाण्यात तोडफोडीत नसलेल्या नगरसेवकांवर पण गुन्हे दाखल केले. त्यावेळी पोलीस ठाण्यात भाजपाचे आजी - माजी नगरसेवक, पदाधिकारी ठाण मांडुन होते. रात्री नगरसेवकांना अटक करण्यासाठी घरी पोलीस पाठवले गेले. त्यातच मेहतांनी शिवसेनेवर टिकेची झोड उठवली. सेना भाजपाच्या मेहेरबानीवर असुन मारपीट सेनेच्या रक्तात आहे असे सांगत उध्दव ठाकरे व शिवसैनिकांच्या संस्कारांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. सेनेचे काही नगरसेवक तर व्यक्तीगत रीत्या मेहतांवर नाराज होते. जेणे करुन विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बहुतांश नगरसेवक, पदाधिकारायांनी उघडपणे मेहतांच्या विरोधात दंड थोपटत गीता जैन यांचा प्रचार केला होता. गीता यांनी मेहतांचा केलेल्या दारुण पराभवात शिवसेनेचा देखील सिंहाचा वाटा होता. नव्हे बाळासाहेबांच्या कलादालनास विरोध करतानाच उध्दव ठाकरे व शिवसैनिकांचे संस्कार काढणाऱ्या मेहतांचा सोमय्या केल्याच्या प्रतिक्रीया शिवसैनिकांनी दिल्या होत्या.

मेहतांनी देखील सरनाईकांच्या मतदार संघातील भाजपा नगरसेवक, पदाधिकारायांना स्वत:च्या मतदार संघात बोलावुन घेतले होते. सरनाईकां विरोधात नोटाचा वापर करण्याचे निर्देश भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आल्याने सुमारे ९ हजार मतं नोटावर पडल्याचे सेनेच्या सुत्रां कडुन सांगीतले जातेय.

गीता जैन यांनी केलेल्या पराभवासह शिवसेनेने देखील उघडपणे गीता यांना साथ दिल्याचा रोष मेहता व समर्थकां मध्ये होता. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातुन गीता यांनी भाजपाला पाठींबा दिल्याने मीरा भार्इंदर भाजपात गीता यांचे वर्चस्व वाढण्याची चिन्हं आहेत. त्यातच नरेंद्र मेहतांनी एका मुलाखती वेळी थेट शिवसेनेला संपवणार असल्याचे म्हटले आहे. येणाराया २०२२ च्या महापालिका निवडणुकां मध्ये पण शंभर टक्के भाजपाचेच वातावरण असणार आहे. आता तर माझे आणि गीता जैन यांचे सर्वात पहिले टार्गेट शिवसेना राहिल. आणि येणाराया काळात शिवसेनेला शहरातुन मुळासकट संपवुन टाकु असे मेहता यांनी म्हटले आहे. शिवसेना मोठी विश्वासघातकी पार्टी आहे. शिवसेना नेहमीच शहरात विश्वासघात करत आली आहे. आणि मी लिहुन देतो की आम्ही दोघे मिळुन गद्दारी करणाराया शिवसेनेला संपवुन टाकु असा निर्धार मेहतांनी बोलुन दाखवला आहे.

गीता भाजपा सोबत आल्याने पक्षात त्यांचे वर्चस्व वाढण्याची धास्ती मेहता व समर्थकां मध्ये असल्याची चर्चा आहे. गीता व शिवसेना या दोघां विषयी रोष असणे स्वाभाविक मानले जाते. परंतु गीता यांच्यासह मिळुन शहरातुन शिवसेनेला मुळा सकट संपवुन टाकु असे बोलुन मेहतांनी गीता यांची देखील कोंडी करण्याची खेळी केल्याचे मानले जातेय. कारण ज्या गीता यांना मेहतां विरोधात निवडुन आणण्यासाठी शिवसैनिकांनी उघड बंड केले त्याच सेनेला संपवण्याची भाषा मेहतांनी केली आहे.

गीता जैन ( आमदार ) - शिवसेनेची केंद्रात भाजपाशी युती असुन राज्यात युतीने एकत्र विधानसभा निवडणुक लढवली आहे. सत्तेची समीकरणं जुळवण्यात वरिष्ठ नेते प्रयत्नशील असुन मी तरी सद्या मित्र पक्षा बद्दल काही बोलु शकत नाही. मेहतांनी काय वक्तव्य केले याची मला माहिती नाही. माझ्याशी तशी कुठली चर्चा झालेली नाही. एकमात्र नक्की की, मी शहरवासियांना भ्रष्टाचार, गुंडगीरी, मनमानी, टेंडर - टक्केवारी संपवुन टाकण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि त्यावर मी ठाम आहे. पंतप्रधान मोदीजी व मुख्यमंत्री फडणवीसजी यांच्या आदर्शांवर वाटचाल करुन शहराचा विकास व नागरीकांना दिलासा देण्याचे काम करणार आहे.

Web Title: will end Shiv Sena from Meera Bhayandar; Former MLA Narendra Mehta takes oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.