सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश कोणासाठी?, गणेश नाईकांच्या भूमिकेमुळे तर्कवितर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:32 IST2019-01-23T00:32:31+5:302019-01-23T00:32:34+5:30
राष्ट्रवादीची परिवर्तन संकल्प यात्रेची सभा पुर्वेकडील चक्कीनाका परिसरातील मैदानात १४ जानेवारी रोजी पार पडली.

सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश कोणासाठी?, गणेश नाईकांच्या भूमिकेमुळे तर्कवितर्क
कल्याण : राष्ट्रवादीची परिवर्तन संकल्प यात्रेची सभा पुर्वेकडील चक्कीनाका परिसरातील मैदानात १४ जानेवारी रोजी पार पडली. या सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश ठाणे जिल्हा प्रभारी गणेश नाईक यांनी ऐनवेळी दिल्याचे समोर आले आहे. दोन दिवस बाकी असताना सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश अचानक देण्यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. नाईक यांच्या आदेशानंतरही सभेचे ठिकाण बदलले गेले नसले तरी, हनुमंते यांच्या राजीनामापत्रात याचा उल्लेख झाल्याने तर्कवितर्क काढणे सुरु आहे.
राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी त्यांचा राजीनामा सोमवारी पाठविला. पक्षाच्या सभेला पुरेशी गर्दी जमवू शकलो नसल्याने नैतिक जबाबदारी म्हणून आणि पक्षांतर्गत असहकार्याला कंटाळल्याचे कारण त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. राजीनामा पत्रात त्यांनी गणेश नाईक यांनी सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश दोन दिवस आधी दिले होते; परंतू ऐनवेळी मी ते आदेश पाळू शकलो नाही असेही म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, पुर्वेतील मैदानाची निवड का करण्यात आली, त्याचीही कारणे त्यांनी नमूद केल्याने हनुमंते यांना नाईकांचा आदेश रूचला नसावा, अशी शंका उपस्थित होते.
>राष्ट्रवादीची सभा पार पडली, ते ठिकाण कल्याण पूर्व मतदारसंघात येते. येथील स्थानिक आमदार भाजपाचे गणपत गायकवाड हे पूर्वी राष्ट्रवादीचे सहयोगी अपक्ष आमदार होते. त्यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे नाईकांनी सभेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. दुसरीकडे मैदानाबाबत काही वाद असल्याने हे आदेश दिले असावेत, अशीही चर्चा आहे. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते व्यस्त असल्याचे समजले.