संजय राऊत बोलायला लागले की लोक टिव्ही बंद करतात, त्यांना गांभीर्याने घेऊ नका; शंभूराज देसाई यांचा टोला
By अजित मांडके | Updated: February 22, 2023 16:28 IST2023-02-22T16:26:10+5:302023-02-22T16:28:48+5:30
"ज्यांनी शिवसेना उभी केली, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, कष्ट घेतले, अशा आनंद दिघे यांच्या कार्यालयातून जर शिवसेनेचे कामकाज चालत असेल तर त्याचपेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही."

संजय राऊत बोलायला लागले की लोक टिव्ही बंद करतात, त्यांना गांभीर्याने घेऊ नका; शंभूराज देसाई यांचा टोला
ठाणे : पालकमंत्री शंभूराज देसाई हे बुधवारी ठाणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. ज्याप्रकारे संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केलेला आहे, त्याप्रमाणे ते श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी, असे वक्तव्य करत आहेत, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच संजय राऊत बोलायला लागल्यानंतर लोक टीव्ही बंद करतात, असा टोलाही शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांना माध्यमांशी बोलताना लगावला.
याच बरोबर, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. शासनाच्या उच्च पातळीवरून निर्णयाची माहिती एमपीएससी बोर्डाला दिली जाईल, असेही शंभूराजे देसाई यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणत्याही गुंडांचा वावर आढळून आला नसल्याचे स्पष्टीकरण ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाणचिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर प्रथमच कार्यकारणी बैठक पार पडली आणि या कार्यकारणी बैठकीत शिवसेनाप्रमुख कार्यालय म्हणून आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमाची निवड करण्यात आली आणि याच आनंद आश्रमामधून शिवसेनेचा पुढील कारभार चालवला जाणार आहे ज्यांनी शिवसेना उभी केली, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, कष्ट घेतले, अशा आनंद दिघे यांच्या कार्यालयातून जर शिवसेनेचे कामकाज चालत असेल तर त्याचपेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही, असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.