गुडविनच्या स्ट्राँगरुममध्ये दडलंय तरी काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 01:46 AM2019-11-06T01:46:08+5:302019-11-06T01:46:32+5:30

तपास यंत्रणेकडून उघडण्याची प्रतीक्षा : गुंतवणूकदारांचे डोळे लागलेत निर्णयाकडे

What if buried in Goodwin's Strongroom? | गुडविनच्या स्ट्राँगरुममध्ये दडलंय तरी काय ?

गुडविनच्या स्ट्राँगरुममध्ये दडलंय तरी काय ?

Next

अनिकेत घमंडी 

डोंबिवली: गुडविन ज्वेलर्सची स्ट्राँगरुम लवकरात लवकर पोलिसांनी उघडावी, अशी मागणी या घोटाळ््यात फसवणूक झालेले गुंतवणूकदार करीत आहेत. सर्वच गुंतवणूकदारांच्या आशा-आकांक्षा या स्ट्राँगरुमवर केंद्रीत झाल्या आहेत. त्यामध्ये लोकांचे पैसे व दागिने असतील तर तो मोठा दिलासा ठरेल. अन्यथा निराशेच्या गर्तेत सापडलेल्या गुंतवणूकदारांकरिता तो मोठा धक्का असणार आहे.
गुडविन ज्वेलर्सच्या सर्व दुकानांचे पंचनामे पोलिसांनी सुरु केले आहेत. डोंबिवलीमधील दुकानात असलेली स्ट्राँगरुम मात्र उघडली नसल्याने त्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे दागिने, पैसे असू शकतात, अशी आशा गुंतवणूकदारांना आहे.

डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रस्त्यावरील दुकानाचे सील काढून त्याचा पंचनामा करतांना तपासयंत्रणेच्या हाती काही लागले नाही. परंतु दुकानातील स्ट्राँगरुम मात्र अद्याप उघडण्यात आलेली नाही. दुकानात जेथे कार्यालयीन काम चालते तेथील पाहणी तपासयंत्रणेने केली. एका ठिकाणी अवघ्या ६५ हजारांच्या चांदीचा ऐवज आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्रीच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सराफा व्यापारी हे त्यांच्या दुकानांमधले दागिने एकत्र करुन स्ट्राँगरुममध्ये अथवा तिजोरीत ठेवतात. काही सराफांकडे त्याला अलार्मही असतो. जेणेकरुन ऐवजाची चोरी होऊ नये. अनेक ठिकाणी सीसी कॅमेरे लावलेले असतात. गुडविनमध्येही स्ट्राँगरुम असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुकान सर्वांक्षम उघडले त्यावेळी स्ट्राँगरुमची पाहणी करण्यासाठीही आग्रह करण्यात आला होता, परंतु त्याची चावी विशिष्ठ पद्धतीची असते, त्यामुळे ती सहजासहजी उघडता येत नाही, स्ट्राँगरुम उघडण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीला बोलवावे लागते, अशी माहिती शहरातील अन्य एका सराफा व्यापाऱ्याने दिली. काही व्यापाऱ्यांनी तपास यंत्रणेला अशा तज्ज्ञ व्यक्तीचा मोबाइल नंबरही दिला असल्याचे सांगण्यात आले. त्या संबंधिताला बोलवायचे झाले तर तपासयंत्रणेचे एक पत्र त्याला द्यावे लागते. पोलीस, पंचांसमक्ष ती व्यक्ती दरवाजा उघडते. ही माहिती पोलिसांना देऊनही आतापर्यंत त्या दृष्टीने पावले उचलली गेली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे नेमके त्या स्ट्राँगरुममध्ये काय दडले आहे? तपास यंत्रणा स्ट्राँगरुम तातडीने उघडून नाडलेल्या गुंतवणूकदारांच्या उत्सुकतेचे समाधान का करीत नाही? त्यात दागिने, अलंकार असतील तर त्याचे योग्य मूल्यमापन करून सामान्यांच्या गुंतवणुकीचा परतावा देता येऊ शकतो.

दुकानातील स्ट्राँगरुमची पाहणी करण्याचे तपास यंत्रणेत्या लक्षात आहे. यंत्रणा त्या दिशेनी कामाला लागली आहे. ती उघडण्यासाठी ज्या तरबेजांना पाचारण करावे लागते त्यांच्याशी अल्पावधीत संपर्क साधण्यात येणार आहे. अन्य विविध दुकाने, कार्यालये आदींची पाहणी करण्याचे काम सुरुच आहे.
- शंकर चिंदरकर, तपासाधिकारी, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग,ठाणे
 

Web Title: What if buried in Goodwin's Strongroom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.