Wagle Estate Fire News: प्रथमेश अपार्टमेंटला लागलेली आग विझवली; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 00:06 IST2025-10-30T00:04:56+5:302025-10-30T00:06:22+5:30
मंगळवारी रात्री सुमारे ९.४५ वाजताच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ, रोड क्रमांक २७ येथील प्रथमेश अपार्टमेंट (तळ मजला + चार मजली इमारत)च्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागली होती.

Wagle Estate Fire News: प्रथमेश अपार्टमेंटला लागलेली आग विझवली; एकाचा मृत्यू
ठाणे : वागळे इस्टेटमधील शांतीनगर परिसरात असलेल्या प्रथमेश अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री लागलेली आगअग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे विझवण्यात आली. या घटनेत सचिन निकम (वय ४५) हे आगीच्या भक्ष्य स्थानी आले. त्यांना उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मंगळवारी रात्री सुमारे ९.४५ वाजताच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ, रोड क्रमांक २७ येथील प्रथमेश अपार्टमेंट (तळ मजला + चार मजली इमारत)च्या चौथ्या मजल्यावरील रूम क्रमांक ४२ मध्ये अचानक आग लागली. ही आग लागल्याची माहिती वागळे अग्निशमन केंद्राकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली.
आगीच्या ठिकाणी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान, महावितरणचे कर्मचारी, एक फायर वाहन, एक रेस्क्यू वाहन आणि एक खासगी रुग्णवाहिका दाखल झाली. जवानांनी अल्पावधीतच बचावकार्य सुरू करून आग आटोक्यात आणली. सुमारे १०.१० वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली.
या घटनेत घरमालक सचिन निकम (वय ४५) यांना भाजल्याने उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर आग लागल्याने घरातील इलेक्ट्रिक वायरिंग, सीलिंग फॅन, गाद्या आणि इतर घरगुती वस्तू जळून नुकसान झाले.
अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग शेजारील भागात पसरली नाही. घटनास्थळी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.