Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:09 IST2025-12-31T14:08:28+5:302025-12-31T14:09:46+5:30
३० डिसेंबरच्या रात्री ९ ते ११ या वेळेत हा प्रकार घडला. भाईंदर रेल्वे स्थानकात केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत सूचना दिल्या जात होत्या.

Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
मीरा भाईंदर - मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मराठी अमराठी वाद सातत्याने उफाळून येतो. त्यातच भाईंदर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक प्रकार मराठी एकीकरण समितीने उघडकीस आणला आहे. याठिकाणी रेल्वे अधिकारी विपीन सिंह यांनी एका मराठी तरुणाला २ ते ३ तास डांबून ठेवल्याचा आरोप होत आहे.
जिगर पाटील असं या मराठी तरुणाचे नाव आहे. ३० डिसेंबरच्या रात्री ९ ते ११ या वेळेत हा प्रकार घडला. भाईंदर रेल्वे स्थानकात केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत सूचना दिल्या जात होत्या. त्यावर स्थानिक नागरीक जिगर पाटील यांनी मराठी भाषेत सूचना का देत नाही असं विचारत स्टेशनवरील तक्रार वही मागितली. त्यावेळी स्टेशन मास्टर विपीन सिंह यांनी या तरुणाला अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप आहे. मराठी नही है तो क्या करेगा..आरपीएफ को बुलाव, रूक तुझे दिखाता हू असे शब्द या तरुणाला वापरले. तक्रार केल्याच्या गुन्ह्यासाठी जिगर पाटील याला तब्बल २ तास थांबवून ठेवले होते असा आरोप आहे.
या घटनेची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीचे प्रमोद पार्टे, महेश पवार, प्रवीण भोसले, नाना खुले या कार्यकर्त्यांनी तात्काळ स्टेशनवर धडक दिली आणि प्रशासनाला जाब विचारत या तरुणाची सुटका केली. याबाबत मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते म्हणाले की, भाईंदर रेल्वे स्थानकावर येथील स्टेशन मास्टर सातत्याने संतापजनक प्रकार करत असतात. जिगर पाटील या मराठी तरुणाने स्टेशनवर मराठीत सूचना होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणले. त्याबाबत तक्रार नोंदवहीत केली. मात्र विपीन सिंह मुजोर रेल्वे अधिकारी त्यांनी या तरुणाला द्वेषाने २ तास डांबून ठेवले. अधिकाऱ्यांना सांगून तिथे बसवून ठेवले असं त्यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
या प्रकाराबाबत जिगर पाटील यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मी सकाळी कामावर जायला ट्रेन पकडण्यासाठी भाईंदर स्टेशनवर आलो होतो. बऱ्याचदा याठिकाणी मराठीत सूचना दिली जात नाही. त्यावर वारंवार तक्रार करूनही सुधारणा केली नाही. त्यामुळे मी संध्याकाळी स्टेशनवर आलो तेव्हा याबाबत स्टेशन मास्टरकडे पुन्हा तक्रार केली. तेव्हा विपीन सिंह नावाचे अधिकारी तेरा रोज का ये नाटक है, तुझे दिखाता हू असं सांगत RPF ला बोलावले आणि माझ्यावर खोटा गुन्हा नोंद करण्यास सांगितले. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करा असं पोलिसांना बोलले. जवळपास २-३ तास मला तिथे ताटकळत ठेवले. त्यानंतर मी मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला तेव्हा त्यांचे कार्यकर्ते स्टेशनला पोहचले असं जिगर पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, महाराष्ट्रात सातत्याने असे प्रकार घडत आहे. कायदेशीर मार्गाने मराठी भाषेच्या वापराबाबत तक्रार केली असता सुधारणा होत नाही. त्रिभाषा सूत्रानुसार प्रथम राज्याची भाषा, मग दुसरी भाषा आणि तिसरी भाषा असं कायद्यात आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन रेल्वे अधिकारी करतात. तात्काळ या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली.