वनरक्षक भरती प्रक्रिये दरम्यान उफाळला वाद
By Admin | Updated: November 8, 2016 02:05 IST2016-11-08T02:05:13+5:302016-11-08T02:05:13+5:30
डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावर नरपड ते चिखले दरम्यान वनरक्षक भरती प्रक्रियेकरिता धावण्याची चाचणी सुरू आहे.

वनरक्षक भरती प्रक्रिये दरम्यान उफाळला वाद
डहाणू/बोर्डी : डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावर नरपड ते चिखले दरम्यान वनरक्षक भरती प्रक्रियेकरिता धावण्याची चाचणी सुरू आहे. आगामी पाच दिवसांसाठी प्रतिदिन आठ टप्यातील प्रत्येक फेरी दरम्यान रस्यावरील वाहतूक वीस मिनिटांसाठी रोखण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी झाल्याने संतापलेल्या चाकरमान्यांनी भरतीप्रक्रिया उधळवून लावण्याचा पवित्र घेतला होता. मात्र, घोलवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी समन्वय साधल्याने वादावर पडदा पडला आहे.
पालघर जिल्ह्याच्या अनुसूचीत क्षेत्रातील ६२ वनरक्षकांच्या भरती प्रक्रि येसाठी ४५६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. या करिता ५ किमी धावण्याची चाळणी चाचणी ५ ते १० नोव्हेंबर या कलावधीत होत असून त्याची प्रक्रीया शनिवारी सुरु झाली आहे. डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरील नरपड पोलीस चौकी ते चिखले वडकती मैदान या भागाची निवड करण्यात आली आहे. प्रतिदिन सकाळी ७:३० ते ११:१५ आणि दुपारी ४ ते ७ या आठ फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक फेरी वेळी रस्त्यावरील वाहतूक सुमारे वीस मिनिटांसाठी रोखली जात आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी नोकरीला जाणाऱ्या चाकरमान्यांना पीक अवर मध्ये वाहतुकीला अडथळा येऊन पहिल्याच दिवशी रेल्वे आणि बस चुकल्याने नोकरीच्या ठिकाणी लेट मार्कचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, चिखले, घोलवड आणि बोर्डी या गावातील नागरिकांना या वनरक्षक भरती प्रक्रीयेची माहिती देण्यात आली नव्हती. वन विभागानेही याची माहिती दिलेली नव्हती. (प्रतिनिधी)