Use Hindi language for school students | शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे वावडे
शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे वावडे

- जान्हवी मौर्ये 

डोंबिवली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १४ सप्टेंबरला हिंदी दिनाचे औचित्य साधून ‘एक राष्ट्र एक भाषा’ याचे समर्थन केले होते. हिंदी भाषा देशाला एकसंध बांधून ठेवू शकते. परंतु, देशाचे भावी नागरिक असलेला युवा वर्ग आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिक्षण घेत आहे. इंग्रजी ही त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाची भाषा झाली आहे. त्यामुळे हिंदीचा अभ्यास करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी असून त्यांना या भाषेचे वावडे असल्याचे पाहायला मिळत आहे.

चंद्रकांत पाटकर विद्यालयातील हिंदी विषयाच्या शिक्षिका कविता राऊत म्हणाल्या, मुले हिंदी भाषेत एकमेकांशी संवाद साधतात, चित्रपट पाहतात. पण, इतर विषयांपेक्षा हिंदी विषयात कमी गुण मिळतात. हिंदीच्या तुलनेत इतर विषयांत गुण चांगले मिळतात. हिंदी भाषा बोलणे आणि अभ्यास करणे यात फरक पडतो. शुद्ध भाषा त्यांना फार कमी ऐकायला मिळते. जे ऐकतात, तेच लिहितात. त्यामुळे त्यांचे गुण कमी होतात. विद्यार्थ्यांना करिअरसाठी इंग्रजी भाषा महत्त्वाची वाटते. त्यामुळे विद्यार्थी त्या विषयाला अधिक प्राधान्य देतात. हिंदीत जेवढे साहित्य उपलब्ध व्हायला हवे, ते होत नाही. अभियांत्रिकीचा अभ्यास इंग्रजीत आहे. त्यासाठी हिंदी किंवा मातृभाषेत साहित्य नाही. हे साहित्य उपलब्ध झाल्यास विद्यार्थी त्याकडे वळतील. हिंदी भाषाही रोजगार देऊ शकते. मात्र, त्या अंगाने त्याकडे पाहिले जात नाही. हिंदी भाषेत करिअर करण्यासाठी संधी कमी उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थी भाषेच्या कारणांमुळे मागे पडत आहे.

पाटकर शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता तावडे म्हणाल्या, हिंदी भाषेचे महत्त्व मुलांना पटवून दिले नाही. हिंदीची शुद्ध भाषा कोणाला येत नाही. हिंदी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. चित्रपटातील हिंदी मुलांना चांगली येते. परदेशी भाषेचे फॅड आले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जा त्यांना मिळत असल्याने मुले त्या भाषांकडे वळतात. इयत्ता आठवीनंतर विद्यार्थी हिंदी भाषेकडे कमी वळतात. हिंदीची आवड असणारेच हिंदी घेतात. आपल्याकडे ३०० भाषा आहेत. त्यामुळे हिंदी राष्ट्रभाषा झाली पाहिजे. मुंबईत सर्व भाषिक एकत्र आले तरी त्यांच्याकडून जास्तीतजास्त हिंदी बोलली जाते. डॉन बॉस्को शाळेतील विद्यार्थी आरमन कपास म्हणाला, हिंदीत काना, मात्रा, वेलांटी असल्यामुळे मला शब्द नीट समजत नाहीत. त्यामुळे हिंदीचा अभ्यास करायला मला आवडत नाही. तर, मंथन सालियन याने सांगितले, हिंदी विषयाचा अभ्यास करायला मलाही कंटाळा येतो. त्यापेक्षा इंग्रजी विषय चांगला वाटतो. करिअरच्या दृष्टीने हिंदीला फारसा स्कोप नाही. ब्लॉसम स्कूलमधील विद्यार्थी अथर्व वाघ म्हणाला, हिंदीचे शुद्धलेखन समजत नाही. वर्णमाला आधी शिकलो आहे, तेव्हा पण शिक्षक जलदगतीने शिकवत असल्याने आता ही हिंदीचा विषय परिपक्व झाला नाही. गार्डियन स्कूलमधील श्रेया सडेकर यांच्या मते, हिंदीतील शब्दांचे अर्थ समजायला कठीण जातात. हिंदीचे वाचन फारसे होत नाही. त्यामुळे लिहितानाही त्रास होतो.

साहित्य कधी वाचणार?
पालक प्राजक्ता सडेकर म्हणाल्या, शाळेकडून हिंदीपेक्षा इंग्रजी विषयाकडे जास्त भर दिला जातो. आमच्या काळात विविध स्पर्धा होत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी निर्माण होत होती. आता तसे होत नाही. मुले आताच शालेय पातळीवर हिंदी वाचत नाही तर साहित्याचा अभ्यास कधी करणार.


Web Title: Use Hindi language for school students
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.